आता एक वर्षाने नवी माहिती समोर येते, यावरून गेल्या वर्षीचा तपास योग्य नव्हता हे सिद्ध होते. त्यामुळेच हा विषय पूर्णपणे निकालात काढण्यासाठी विशेष चौकशी पथक तयार करून पैसे दिलेल्यांची, घेणाऱ्यांची आणि ते पैसे गेले कुठे? कशा पद्धतीने त्याचा वापर झाला? याची चौकशी पारदर्शकपणे व्हायला हवी.

नोकरी देतो म्हणून सांगून सहाशेपेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या पूजा नाईकने एका वर्षानंतर केलेले गौप्यस्फोट तिच्या एकूणच कारनाम्यांची व्याप्ती किती मोठी आहे, हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे. तिच्यावर विश्वास किती ठेवायचा आणि का ठेवायचा, असा प्रश्न आहेच पण पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली तर निश्चितच हा घोटाळा नेमका किती मोठा आणि त्यात कोणाची नावे येतात ते स्पष्ट होईल. सध्या पूजा नाईक हिने दोन अधिकाऱ्यांची नावे पोलीस चौकशीत घेतल्याचे पोलीसच सांगतात. मात्र पूजा नाईकचे म्हणणे आहे की, ही नावे गेल्या वर्षीही आपण पोलिसांना सांगितली होती. आता पोलीस त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याच्या विचारात आहेत आणि त्यासाठी सरकारची मान्यता मागत आहेत. मग वर्षभर पोलिसांनी या प्रकरणात त्या अधिकाऱ्यांना बोलावले होते काय? त्यांची चौकशी करून पूजा नाईक सांगते त्याप्रमाणे आर्थिक व्यवहार तपासले होते का? की पोलिसांनी हे प्रकरण आधी हलक्यात घेऊन आता पूजा नाईकचे विधान गांभीर्याने का घेतले, ते स्पष्ट व्हायला हवे. अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंद करायची झाली तर त्यांना पैसे दिल्याचे काही पुरावे पोलिसांकडे आता सापडले आहेत का? कारण वर्षभर पोलिसांना यात काही सापडले नव्हते, मग आताच काही पुरावे सापडले असतील तर त्या अधिकाऱ्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होतानाच सेवेतून तात्काळ निलंबन व्हायला हवे. असे अधिकारी एक दिवसही सरकारी सेवेत राहता कामा नयेत, परंतु त्यासाठी पूजा नाईक करत असलेल्या आरोपांचाच आधार चालणार नाही. त्यासाठी या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे काहीतरी पुरावे हवेत. पूजा नाईक म्हणते त्याप्रमाणे तिने सहाशेपेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतले होते, हे ती आता कबूल करते. हीच पूजा नाईक गेल्या वर्षी अटक झाल्यानंतर जामिनावर सुटून गेली. म्हणजे तिने तपास यंत्रणा आणि न्यायालयाला चुकीची माहिती दिली होती. ती खोटे बोलत असेल तर तिलाही शिक्षा व्हायला हवी. तिने ज्या सहाशेपेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतले, त्याची यादी तिच्याकडे असेल. त्या यादीप्रमाणे पोलिसांनी त्या पैसे देणाऱ्यांची चौकशी करायला हवी.
एका मंत्र्याचे नाव पूजा घेते, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे गोव्यात सध्या राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. एका मंत्र्याची बदनामी होते म्हणून इतर सगळे मंत्री, आमदार गंमत बघत आहेत. पण हे आरोप खोटे असतील तर आज एक मंत्री आहे, उद्या कोणाचेही नाव हे लोक घेऊ शकतात. एका वर्षानंतर जर अशा प्रकारचे नाटक रचले जात असेल, तर यामागे कोणी सूत्रधार आहे का किंवा हा सगळा राजकीय नाट्याचा भाग आहे का, ते पडताळण्याची गरज आहे. सहाशेपेक्षा जास्त लोकांचे सरकारी नोकरी देतो म्हणून पैसे घेतले असतील तर त्या लोकांची चौकशी करून त्यांच्या तक्रारी घेणे आणि नव्याने पूजा नाईकवर गुन्हे नोंदवणेही गरजेचे आहे. फक्त या साऱ्या प्रकरणात कोणाची नाहक बदनामी होऊ नये. पण जी व्यक्ती आपण पैसे घेतले असे कबूल करते त्याची गय न करता, तिने कोणाला इतके पैसे दिले, पैसे कुठल्या कालावधीत तिच्याकडे आले, त्या काळात तिने कुठल्या प्रकारची खरेदी केली किंवा कुठे पैसे गुंतवले, या साऱ्या गोष्टींचा योग्य पद्धतीने तपास केल्यास आर्थिक व्यवहारांची माहिती हाती लागू शकेल. रोख व्यवहार झाले असतील तर ते पैसे कुठे गेले, त्याची माहिती मिळणे शक्य आहे. त्यामुळे पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग, काही तज्ज्ञ चार्टर्ड अकाऊंटंट यांची मदत घेऊन हे व्यवहार तपासण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी तक्रारी आल्या, अटक झाली आणि आरोपींची सुटकाही झाली. आता एक वर्षाने नवी माहिती समोर येते, यावरून गेल्या वर्षीचा तपास योग्य नव्हता हे सिद्ध होते. त्यामुळेच हा विषय पूर्णपणे निकालात काढण्यासाठी विशेष चौकशी पथक तयार करून पैसे दिलेल्यांची, घेणाऱ्यांची आणि ते पैसे गेले कुठे? कशा पद्धतीने त्याचा वापर झाला? याची चौकशी पारदर्शकपणे व्हायला हवी.