चौकशी समितीने कुणावर फोडले खापर? सविस्तर वाचा...
पणजी : शिरगाव लईराई जत्रोत्सवावेळी घडलेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू, तर ८० पेक्षा अधिक भाविक जखमी झाले होते. जखमींना साखळी, डिचोली आरोग्य केंद्रासह म्हापसा आझिलो व गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जत्रोत्सवात धोंड, भाविक आणि प्रशासन यांच्याकडून जागरूकता व शिस्त आवश्यक आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिली होती.
या दुर्घटनेची दखल घेत सरकारने सखोल चौकशीसाठी महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने घटनास्थळी जाऊन तसेच प्रत्यक्षदर्शींशी चर्चा करून अखेरीस पाच दिवसानंतर अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला आहे.
हा अहवाल १०० पानांचा असून गुरूवारी रात्री उशीरा मुख्य सचिव डॉ. वी. कांडावेलू यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. या अहवालावर सरकारच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती चौकशी समितीचे प्रमुख संदीप जॅकीस यांनी दिली होती.
'यांना' ठरवले दोषी ः-
दरम्यान अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यावर भाष्य केले आहे. लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीस चौकशी समितीने उत्तर गोव्याच्या माजी जिल्हाधिकारी स्नेहा गीते, माजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे माजी उपअधीक्षक जीवबा दळवी, माजी निरीक्षक दिनेश गडेकर, माजी उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर यांच्यासह देवस्थान समिती आणि पंचायत समितीलाही दोषी ठरवले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. सरकार अहवालातील निष्कर्ष तपासत असून, दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी हमीही त्यांनी दिली.
आजी-माजी अध्यक्षांचे आरोप
दरम्यान या दुर्घटनेवरून लईराई देवस्थानच्या आजी-माजी अध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी या घटनेस विद्यमान अध्यक्ष दिनानाथ गावकरच जबाबदार असल्याचा आरोप केला होता तर, दिनानाथ गावकर यांनी यात गणेश गावकर यांचा हात असू शकतो असा दावा केला होता.