ऑपरेशन सिंदूरनंतर गोव्यात 'अशी' आहे परिस्थिती

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
ऑपरेशन सिंदूरनंतर गोव्यात 'अशी' आहे परिस्थिती

पणजी : देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये गोवा पोलीस देखील हाय अलर्टवर आहेत. राज्यातील महत्त्वाची स्थळे, पर्यटन स्थळे, किनारे व अन्य संवेदनशील स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेष करून किनारी पोलीस, पर्यटक पोलिसांना संशयास्पद गोष्टींबाबत बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व बटालियन (आयआरबी) तसेच गोवा पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या विभागांना मनुष्यबळ कमी पडू नये याची खात्री करण्यात आली आहे. 

यानुसार बॉम्ब विरोधी पथक, दहशतवाद विरोधी पथक तसेच सुरक्षा विभागांना अतिरिक्त कर्मचारी पुरवण्यात आले आहेत. पोलिसांनी  भाडेकरू तसेच विदेशी नागरिकांची तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.



राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली आहे. पोलीस महासंचालकांनी राज्यातील लष्कर, नौदलाचे प्रतिनिधी, तटरक्षक दल, सीआयएसएफ, रेल्वे संरक्षण दल, आयओसीएल प्रतिनिधींसह पोलीस अधीक्षक यांच्यासोबत समन्वय बैठका घेण्यात आल्या आहेत. यावेळी राज्यातील सुरक्षेसह आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कृतीची चर्चा करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईत  वाढ केली आहे.


राज्यभरात तपासणी
भाडेकरू आणि नोकर पडताळणीसाठी मोहिमा, संशयास्पद व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, विदेशी व्यक्तींची पडताळणी सतत सुरू आहे. संवेदनशील परिसर आणि महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये आणि त्यांच्या आसपास प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात विशेष तपास नाके आणि जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात येणार आहे. 

देशविरोधी घटकांच्या हालचाली रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर सखोल तपासणी केली जात आहे. तसेच खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती देणारे सोशल मीडिया हॅन्डल शोधून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

६०० विदेशी नागरिकांची पडताळणी
पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत ६०० विदेशी नागरिकांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच २२,२२९ भाडेकरू, ५५६ अज्ञात व्यक्ती  ५१५ काश्मिरी व्यक्तींची तर ४,९४९ घरातील नोकरांची पडताळणी केली आहे. संशयास्पद २,४६७ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. यादरम्यान १,४१३ हॉटेल्स ,गेस्ट हाऊस तपासण्यात आले. तर एकूण १५३ कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहेत.

हेही वाचा