बार्देश : शिवोलीतील शेतकऱ्याने पिकवला सोन्यापेक्षाही महाग आंबा

मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप : राजेश धारगळकर यांच्याकडून उत्पन्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
बार्देश : शिवोलीतील शेतकऱ्याने पिकवला सोन्यापेक्षाही महाग आंबा
म्हापसा : ओशेल-शिवोली येथील शेतकरी राजेश धारगळकर हे जगातील सर्वांत महागडा म्हणजेच सोन्यापेक्षाही जास्त भाव असलेल्या आंब्याचे पीक घेणारे गोव्यातील पहिले शतकरी ठरले आहेत. या आंब्याचे नाव ‘मियाझाकी’ असून जागतिक बाजारपेठेत या आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये प्रति किलो आहे. लागवड केल्यानंतर साडेतीन वर्षांनी यंदा प्रथमच आंब्याचे पीक मिळाले आहे. ‘मियाझाकी’ची कलमे बनवून शेतकऱ्यांमार्फत संपूर्ण गोव्यात या आंब्याची लागवड पसरविणे हे धारगळकर यांचे उद्दिष्ट आहे.      


राजेश धारगळकर हे सिव्हिल अभियंता आहेत. मात्र नोकरी न करता ते यशस्वी आंबा शेतकरी म्हणून नावारूपास आले आहेत. आपल्या बागेत ते विविध आंब्यांच्या जातींच्या लागवडीवर समर्पितपणे काम करीत आहेत. आंब्यावरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या बागेत ही जपानी ‘मियाझाकी’ आंबा जात जोडली गेली आहे, जी बंगालमधून आणली गेली आहे. धारगळकर यांचे मित्र तुरुंग खात्याचे अतिरिक्त महानिरीक्षक डॉ. स्नेहल गोलतेकर यांनीही त्यांच्या बागेत या आंब्याची लागवड करून ती वाढवली आहे. धारगळकर यांनी ‘मियाझाकी’ची सात रोपटी लावली होती. त्यातील पाच झाडांनी यंदा फळ देण्यास सुरुवात केली आहे. हा आंबा वजनाने देखील अर्धा किलोपेक्षा जास्त आहे.      
धारगळकर म्हणाले की, २०२१ मध्ये आपण आणि गोलतेकर यांनी आमचे मित्र महेंद्र पेडणेकर यांच्या पश्चिम बंगालमधील कामगारामार्फत बंगालमधून ‘मियाझाकी’चे रोपटे आणले होते. आता सुमारे साडेतीन वर्षांनी या झाडाने आम्हाला उत्पन्न द्यायला सुरुवात केली आहे.      
धारगळकर पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर ‘मियाझाकी’ आंब्याबद्दल एक व्हिडिओ मी पाहिला होता. ज्यात मध्यप्रदेशमधील एका शेतकऱ्याने सांगितले होते की त्यांना प्रति किलो २.७० ते ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. हे आंबे उच्च अँटि ऑक्सिडंट मूल्यांसाठी प्रसिद्ध आहेत, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. शिवाय इतर वैद्यकीय मूल्ये देखील त्यामध्ये आहेत, असे त्यांनी सांगितले होते. पश्चिम बंगालमधून आम्हाला रोपटी मिळाली आणि लागवड केली.      
डॉ. स्नेहल गोलतेकर म्हणाले की, धारगळकर शेतीत पूर्णपणे रमले आहेत. त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या बागेत आंब्याची रोपटी लावली आहेत आणि मलाही पीक मिळाले आहे, याचा मला आनंद आहे.

नवकल्पनांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक      

‘मियाझाकी’ आंब्याची यशस्वी लागवड केल्याबद्दल राजेश धारगळकर यांचे अभिनंदन. मुळात ‘ताईयो नो तामागो’ किंवा ‘एग्स् ऑफ दी सन’ म्हणून ओळखणारी जाणारी ही आंब्याची दुर्मिळ जपानी जात उष्ण हवामानात उगवली जाऊ शकते आणि तीन वर्षांत पीक देणारी म्हणून ओळखली जाते. गोव्याच्या मातीत असे होणारे प्रयत्न आपल्या शेतकऱ्यांच्या दूरदृष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे. गोवा सरकार गोव्याच्या बागायती आणि कृषी क्षेत्राची पुनर्परिभाषा करू शकणाऱ्या आणखी कृषी नवकल्पनांचे कौतुक करते आणि त्यांना प्रोत्साहन देते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.  

या आंब्याचे मूळ नाव ‘ताईयो लो तामागो’ असे आहे. ज्याला आता ‘मियाझाकी’ आंबा असे नाव पडले आहे. मला या जातीची कलमे करून ती संपूर्ण गोव्यात पसरवयाची आहे. कारण आंबे पिकवून केवळ फळे मिळत नाहीत, तर मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळू शकते तसेच गोव्यात हिरवळ देखील पसरेल.
- राजेश धारगळकर, ओशेल - शिवोलीतील शेतकरी


हेही वाचा