सासष्टी : लाचखोरी प्रकरण : सुनील गुडलर आणि मोहम्मद हुसेन यांना सशर्त जामीन मंजूर

उच्च न्यायालयाच्या आदेश

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
08th May, 05:03 pm
सासष्टी : लाचखोरी प्रकरण : सुनील गुडलर आणि मोहम्मद हुसेन यांना सशर्त जामीन मंजूर

पणजी : मांस पुरवठादाराकडून लाच घेतल्याप्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) निलंबित कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर आणि कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन या दोघांना गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्या दोघांना एक लाख रुपये, साक्षीदारांवर दबाव न टाकणे, परवानगीशिवाय गोवा बाहेर न जाणे व इतर अटीच्या समावेश आहेत. याबाबतचा आदेश न्या. वाल्मिकी मिनिझीस यांनी दिला आहे.

कर्नाटकातील मांस पुरवठादाराच्या तक्रारीवरून एसीबीने २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, तक्रारदाराला बनावट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले. तसेच गुन्हा नोंद न करण्यासाठी तसेच व्यवसायात कोणतेही अडथळा न आणण्यासाठी त्याच्याकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती. पहिल्या हप्ता म्हणून २५ हजार रुपये देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने कार्यालयाची झडती घेतली असता, एका टेबल्याच्या ड्रावर मध्ये लाचेची २५ हजार रोख रक्कम सापडली. ती एसीबीने जप्त करत कारवाई केली. त्यानंतर निरीक्षक गुडलर याच्यासह कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन या दोघांना २२ एप्रिल रोजी अटक केली. याच दरम्यान त्या दोघांना पोलीस खात्याने सेवेतून निलंबित केले. दरम्यान एसीबीने त्या दोघांच्या घराची झडती घेतली होती.

या प्रकरणी न्यायालयाने त्या दोघांना ११ दिवसाची एसीबी कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या दोघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. याच दरम्यान त्या दोघांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला . तो न्यायालयाने फेटाळून लावला.त्यानंतर त्या दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर दोघांना वरील अटीवर सशर्त जामीन मंजूर केला. 

हेही वाचा