मडगाव : धर्मापूर कुंकळ्ळी येथे मासळीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला दोघांनी अडवले. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी वाहनाची तपासणी केली व वाहनातील ४.८३ लाखांची रोकड घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंकळ्ळी येथील धर्मापूर येथे दोघांनी मडगाव येथून कर्नाटकात जाणाऱ्या मासळीची वाहतुक करणारे वाहन अडवले. पोलीस असल्याचे भासवून गाडीची तपासणी करायची असल्याचे सांगितले. चालक श्रीधर मुर्डेश्वर (रा. कारवार) याने यास कोणतीही हरकत घेतली नाही. दरम्यान त्या भामट्यांनी गाडीची तपासण्याचा बनाव केला. . वाहनातील तब्बल ४.८३ लाखांची रोख रक्कम उचलून पोबारा केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चालकाने कुंकळ्ळी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांकडून अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.