जॉब वार्ता : जीपीएससीतर्फे १३ जागांवर होणार भरती

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th May 2025, 10:05 am
जॉब वार्ता : जीपीएससीतर्फे १३ जागांवर होणार भरती

पणजी : गोवा लोकसेवा आयोगातर्फे (जीपीएससी) विविध खात्यात १३ जागांवर भरती केली जाणार आहे. यातील सर्वाधिक ६ जागा या सहाय्यक प्राध्यापक (वाणिज्य) पदाच्या आहेत. आरोग्य खात्यातील वरिष्ठ सर्जनच्या दोन जागा ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशनची आहेत. ११ जागांसाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ मे  आहे. तर ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशनच्या जागेसाठी  अंतिम मुदत २३ जून आहे. 

वाणिज्य शाखेच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवाराकडे नेट, सेट अथवा पीएचडी  असणे आवश्यक आहे. एकूण सहा पैकी दोन पदे ओबीसी तर चार पदे एसटी समाजासाठी आरक्षित आहेत.  उमेदवाराचे वय ४५ पेक्षा अधिक नसावे. पात्र उमेदवारांना मॅट्रीएक्स लेव्हल १० प्रमाणे वेतन देण्यात येईल. आरोग्य खात्यात वरिष्ठ सर्जनच्या दोन जागा ट्रान्स्फर ऑन डेप्यूटेशन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी मॅट्रीएक्स लेव्हल ११ प्रमाणे वेतन देण्यात येईल. 

आरोग्य खात्यात थेट पद्धतीने कनिष्ठ सर्जनची एक जागा भरण्यात येणार आहे. उमेदवारांकडे आवश्यक वैद्यकीय शिक्षण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वय ४५ पेक्षा अधिक नसावे. पोलीस खात्यात दोन जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये एक फॉरेन्सिक प्रयोगशाळेत शास्त्रीय सहाय्यक अधिक फोटोग्राफरची आहे. यासाठी उमेदवाराकडून विज्ञान शाखेची पदवी आणि फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

पोलीस खात्यातील शास्त्रीय अधिकारी (डीएनए) पदासाठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. बंदर कप्तान खात्यात मरीन इंजिनियर आणि शिप सर्वेयरची एक जागा भरण्यात येईल. यासाठी उमेदवाराचे वय ४५ पेक्षा अधिक नसावे. तर आदिवासी कल्याण खात्यात मध्ये जिल्हा कल्याण अधिकाऱ्याची जागा भरण्यात येणार आहे. सर्व पदांसाठी अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे. अर्जावर मोबाईल क्रमांक आणि ई-मेल योग्य पद्धतीने लिहिण्याची आवाहन आयोगाने केली आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून आयोगातर्फे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा