पर्यटक पोलिसांनी जीवरक्षकांच्या सहकार्याने राबवली मोहीम
मडगाव : बंगळुरू येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या शर्मा कुटुंबीयांचा माजोर्डा किनारी भागात हरवलेला मुलगा पर्यटक पोलिसांच्या सतर्कतेने सापडला आहे. मुलगा सुखरुप असून पर्यटक पोलिसांनी जीवरक्षकांच्या सहकार्यातून मुलाला शोधून पालकांच्या स्वाधीन केले.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू येथील शर्मा कुटुंबीय पर्यटनासाठी गोव्यात आले होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दक्षिण गोव्यातील माजोर्डा समुद्रकिनारी ते समुद्रस्नानाचा आनंद लुटत होते. त्यावेळी किनारी भागात वाळूत खेळत असलेला शर्मा दांपत्याचा सात वर्षीय मुलगा दिसेनासा झाला. ही घटना लक्षात येताच कुटुंबियांनी किनाऱ्यावर मुलाची शोधाशोध सुरू केली.
मात्र मुलगा सापडत नसल्याने शर्मा कुटुंबीयांनी याची माहिती पर्यटक पोलिसांना दिली. पर्यटक पोलिसांनी मुलाचा फोटो व इतर माहिती जाणून घेत जीवरक्षकाच्या सहकार्यातून शोधमोहीम सुरू केली.
गस्त घालणाऱ्या पोलिसांना सदर मुलगा किनारी भागातील 'शिवारन' या शॅकनजीकच्या भागात आढळून आला. पोलिसांनी ओळख पटवून व इतर कागदोपत्री प्रक्रियेनंतर मुलाची व आईवडिलांची भेट घडवून आणली.