ताळगावच्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अलीकडेच ताळगावमध्ये कोरड्या गवताला आग लागून संपूर्ण शेत जळून गेले. सलग दोन दिवस आग लागण्याच्या घटना घडल्या. या आगीत शेतकऱ्यांची मिरचीची रोपे, भेंडी व इतर भाज्यांचे पीक जळून नुकसान झाले. या घटनेवर कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राज्यात पूर्वी शेतजमिनीत आग लावण्याची पद्धत होती. भाताची कापणी झाल्यानंतर उरलेले तण जाळले जात असे, असे फळदेसाई यांनी सांगितले.
ताळगावमध्ये जी घटना घडली ती भाताच्या तणाला नव्हे तर कोरड्या गवताला आग लागून झाली. या गवताची बी पडून ते सर्वत्र उगवते, त्यामुळे त्याचा प्रसार थांबवण्यासाठी ते जाळले जाते. परंतु राज्य तसेच केंद्र सरकारने आता शेतात आग लावण्यावर बंदी घातली आहे. जमिनीला आग लावल्यावर ती तापते आणि मातीचे पोषण वाढवणारे जमिनीतले सूक्ष्मजीव मरतात, त्यामुळे जमीन नापीक होते, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.
‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत भरपाई
ताळगावमधील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी संचालनालयाकडे आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक जळाले आहे, त्यांनी तिसवाडीच्या विभागीय कृषी कार्यालयात ‘शेतकरी आधार निधी’ अंतर्गत नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा. आम्ही त्यांना थेट आर्थिक भरपाई देऊ, अशी हमी संचालकांनी दिली.