कला अकादमीचे नाट्यगृह ​चित्रपटांसाठी योग्य, नाटकांसाठी नाही!

साऊंड, प्रकाश योजना, एसीमध्ये त्रुटी असल्याचे सल्लागारांकडून अहवालात नमूद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
कला अकादमीचे नाट्यगृह ​चित्रपटांसाठी योग्य, नाटकांसाठी नाही!

पणजी : नूतनीकृत कला अकादमीचे नाट्यगृह नाटक आणि आंंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसारित होणारे (इफ्फी) चित्रपट अशा बहुउद्देशीय उद्देशाने तयार करण्यात आले आहे. नाट्यगृहातील साऊंड, प्रकाश योजना, एसी चित्रपटांसाठी योग्य आहे, नाटकांसाठी नाही. त्यामुळे नाट्यगृहातील साऊंड, प्रकाश योजनेत बदल करण्यात यावे, अशी शिफारस करणारा अहवाल सार्वज​निक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) नियुक्त केलेल्या तिन्ही सल्लागारांनी सरकारला सादर केला आहे. 

कला अकादमीच्या नाट्यगृहातील ध्वनी, प्रकाश यंत्रणा आणि रंगमंचामध्ये त्रुटी असून, त्याचा फटका तेथे सादर होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगांना बसत असल्याचा दावा नाट्य क्षेत्रातील राज्यातील तज्ज्ञ आ​णि विरोधकांकडून करण्यात आला. यावरून सरकार तसेच मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्यावर टीकास्त्र सुरू झाल्यानंतर सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांचे कृतिदल स्थापन केले. या कृतिदलाने प​हिल्याच बैठकीत त्रुटी असल्याचे मान्य करून नाट्यगृहातील ध्वनी, प्रकाश यंत्रणा आणि रंगमंचासंदर्भात तीन सल्लागार नेमण्याच्या सूचना ‘पीडब्ल्यूडी’ला केल्या हाेत्या. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने ध्वनीसाठी रॉजर ड्रेगो, प्रकाश यंत्रणेसाठी शीतल तळपदे आणि रंगमंचासाठी राजन भिसे यांची नेमणूक केली होती. या तिन्ही सल्लागारांनी सरकारला सादर केलेल्या अहवालात नाट्यगृहातील साऊंड, प्रकाश योजना आणि एसीवर बोट ठेवले असल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या सूत्रांनी दिली. 

कला अकादमीत नाटकांसह ‘इफ्फी’ काळात चित्रपटही सादर केले जातात. त्याचा विचार करून संबंधित सल्लागाराने नाटक आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून नाट्यगृहाची रचना केली. परंतु, हे नाट्यगृह चित्रपट प्रसारित करण्याच्या दृष्टीने दर्जेदार आहे. नाटकांसाठी मात्र साऊंड आणि प्रकाश योजना योग्य नाही. त्यामुळे त्यात बदल करण्यात यावे. याशिवाय नाट्यगृहात असलेल्या एसीचा आवाज नाटक सुरू असताना माईकमध्ये जात असल्याने त्याचा फटका अभिनय करणाऱ्या कलाकारांना बसतो. त्यामुळे नाट्यगृहातून एसी हटवून तेथे वेगळ्या प्रकारची व्यवस्था करावी, अशी शिफारश तिन्ही सल्लागारांनी अहवालातून केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार!
- तिन्ही सल्लागारांनी अहवालात केलेल्या शिफारशींनुसार कला अकादमीच्या नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार आहे. आयआयटी चेन्नई किंवा गोवा अभियांंत्रिकी महाविद्यालयातर्फे कला अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे.
- सल्लागारांनी ज्या त्रुटी दाखविल्या आहेत, त्या पूर्वीच्याच कंंत्राटदाराकडून करून घेणे शक्य आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
- पूर्वीच्या कंत्राटामध्ये ज्या गोष्टी होत्या, त्यात त्रुटी असतील, तर संबंधित कंत्राटदाराकडून ती कामे त्यांच्या पैशांतून करून घेतली जातील. त्यांनी संबंधित कामे करून देण्यास नकार दर्शवल्यास त्यांच्याकडून त्यावर खर्च केलेले पैसे वसूल केले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
सल्लागारांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही शुक्रवारी ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, अहवालाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तेथे नव्या सुविधा निर्माण करायच्या असतील तर नव्या सल्लगाराची नेमणूक करून त्या उभारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’चे मुख्य अभियंता वल्लभ पै यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.              

हेही वाचा