नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानने सोशल मिडियावर प्रचाराचा पर्दाफाश केला. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पाकिस्तानने पंजाब व गुजरातमधील उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुज या लष्करी ठिकाणांवर उच्चगती क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. या हल्ल्यांमुळे भारतात सीमावर्ती भागांत काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रॉडक्शन युनिट व एस-४०० डिफेन्स सिस्टम पूर्णपणे सुरक्षित असून, पाकिस्तानचा त्याबाबतचा दावा पूर्णतः खोटा आहे असे कर्नल कुरेशी यांनी सांगितले. दरम्यान विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी शनिवारी सकाळी एएफएस सिरसा आणि एएफएस सुरतगडचे फोटो दाखवले आणि ते सुरक्षित असल्याचे सांगितले.
पाकिस्तानकडून नागरी ठिकाणांना लक्ष्य
पाकिस्तानने रुग्णालये व शाळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी हे प्रयत्न हाणून पाडले. पुंछ, राजौरी, कुपवाडा, बारामुला व अखनूर भागात पाकिस्तानकडून तोफ व मोर्टारद्वारे जोरदार गोळीबार केला असे कर्नल कुरेशी यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांचे स्पष्टीकरण
पाकिस्तानकडून सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, प्रशासनिक इमारती आणि नागरी वस्त्यांवर हल्ले केले जात आहेत. जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्यामुळे अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. पाकिस्तानचा उद्देश भारतात सामाजिक तणाव निर्माण करणे असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचा ठोस प्रत्युत्तर हल्ला
भारताने लगेच प्रत्युत्तर देत रफीकी, मुरीद, चकलाला, रहमयार खान आणि सियालकोट एअरबेसवर अचूक हल्ले केले. लढाऊ विमानांचा वापर करून पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. नागरिकांची हानी टाळण्यासाठी काळजी घेण्यात आली असल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले.यानंतर कर्नल कुरेशी यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यांची फुटेजही माध्यमांसमोर उघड केली.
गेल्या ७ दिवसांत घडलेल्या महत्त्वाचे घडामोडी :
पाककडून एलओसीपासून श्रीनगर ते नलिया पर्यंत २६ ठिकाणी हवाई घुसखोरीचा प्रयत्न झाला.
* भारताच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले – विशेषतः पंजाब,राजस्थान व गुजरातमध्ये.
* भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे प्रमुख लष्करी तळ उद्ध्वस्त – भारताकडून सर्जिकल टप्प्यातील अचूक लक्ष्यवेधी हल्ले.
* आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन – पाकिस्तानकडून नागरी विमानांच्या आडून हल्ल्यांचा प्रयत्न.
दरम्यान, सर्व लष्करी सुविधा सज्ज आहेत आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच अफवा आणि अपप्रचारापासून सावध राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.