लाहोर : पाकिस्तानच्या आगळिकीला भारताचे जोरदार प्रत्युत्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 04:30 pm
लाहोर : पाकिस्तानच्या आगळिकीला भारताचे जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतातील लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी सकाळी जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत लाहोरमधील एक महत्त्वाची हवाई संरक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील विविध ठिकाणांवरील हवाई संरक्षण रेडार प्रणाली लक्ष्य करत उद्ध्वस्त केल्या, असे मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

पाकिस्तानने १६ ठिकाणांवर केले हल्ल्याचे प्रयत्न

पाक लष्कराने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, जालंधर, भटिंडा, भुज, नाल, उत्तरलाई अशा अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचे प्रयत्न केले. मात्र, भारतीय हवाई संरक्षण प्रणाली आणि ड्रोनविरोधी यंत्रणेने हे सर्व प्रयत्न वेळेवर हाणून पाडले. भारताच्या हद्दीत विविध ठिकाणी सापडलेले ड्रोन व क्षेपणास्त्रांचे  अवशेष गोळा करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे. बुधवारी भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी केंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ले करून १००पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद व मुरिदकेमधील लष्कर-ए-तैयबाच्या तळांसह एकूण ९ ठिकाणांचा यात समावेश होता.

सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात १६ नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही गोळीबार सुरूच ठेवला आहे. कुपवाडा, उरी, पूंछ, राजौरी व मेंधार भागांमध्ये जोरदार गोळीबार झाला असून, यात १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे.

भारताने हारोप ड्रोन वापरल्याचा पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानने इस्रायली बनावटीचे हारोप ड्रोन वापरण्यात आल्याचा दावा केला असून, २५ ड्रोन पाडल्याचा आणि एक नागरिक ठार झाल्याचा आरोप पाक लष्कर प्रवक्त्याने केला. काही ड्रोन लाहोर, रावळपिंडी व सिंधमधील शेतजमिनीत कोसळल्याचेही म्हटले जात आहे.

संघर्ष नको, पण उत्तर देणे अनिवार्य! भारताची स्पष्ट भूमिका 

संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारत संघर्ष वाढवू इच्छित नाही. मात्र, देशावर हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देणे आहे. आमची कारवाई संयमित, मोजकी आणि अतिरेक्यांविरोधात केंद्रित होती. मात्र, पाकिस्तानने लष्करी ठिकाणांवर हल्ला केल्यामुळेच प्रत्युत्तर द्यावे लागले, असे मंत्रालयाने म्हटले आहे.


हेही वाचा