फिरोजपूर : पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या झाडून ठार केले. ही घटना ८ मेच्या उत्तररात्री घडली.
बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एकजण पाकिस्तानातून भारताच्या दिशेने सीमा ओलांडून बॉर्डर फेन्सकडे येताना आढळून आला. संशयास्पद हालचाल लक्षात आल्यानंतर जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, तो न थांबता पुढे सरकत राहिला, त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला.
गोळीबारात हा पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. पहाटेच्या सुमारास घटनास्थळी शोध मोहीम राबवण्यात आली आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला. नंतर हा मृतदेह पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.
बीएसएफने या प्रकाराची चौकशी सुरू केली असून घुसखोरीमागील उद्देश शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सततच्या घुसखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीएसएफकडून सीमारेषेवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील तीन ठिकाणी दररोज सायंकाळी होणाऱ्या सेरेमोनियल रिट्रीट (ध्वजवंदन) कार्यक्रम तात्पुरते स्थगित केले आहेत.
बीएसएफच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली असून, अलीकडील सुरक्षेच्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंजाबमधील अटारी, फिरोजपूर आणि हुसैनीवाला या ठिकाणी बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात दररोज सायंकाळी ध्वजवंदन सोहळा पार पडतो. सध्या परिस्थितीत सुधार होईपर्यंत सेरेमोनियल रिट्रीट होणार नाहीत, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.