क्रांतीवीरांचा वारसा चालवत 'ऑपरेशन सिंदूर'ची रणनीती सांगणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी बेळगाव जिल्ह्याच्या स्नुषा
बेळगाव : बेळगाव ही वीरराणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा आणि बेळवडी मल्लम्मा या क्रांतिवीरांची भूमी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या क्रांतीवीरांचा मोलाचा वाटा होता. बेळगावच्या मराठा सेंटर मध्ये बेळगावच्या मातीत तयार झालेले जवान अधिकारी देशाचे रक्षण करत आहेतच त्या सोबत बेळगाव जिल्ह्याच्या स्नुषा कर्नल सोफिया कुरेशी बेळगावचे शूर वीरांचा वारसा पुढे चालवत आहेत. सोफिया यांनी पाकिस्तान विरुद्धच्या भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या लष्करी कारवाईत महत्त्वाची भूमिका निभावत बेळगावचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
आधुनिक युगात यापूर्वी भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती. आता त्याच प्रकारची आणखी एक सैन्य कारवाई अंमलात आणली जात आहे. पाकिस्तान विरुद्धच्या भारताच्या या कारवाईचा क्रांतिवीरांची गौरवशाली परंपरा असलेले बेळगाव देखील एक भाग बनले आहे.
सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवण्यात आले असून या कारवाईत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावाची सूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही बाब बेळगाव जिल्ह्यातील लोकांची मान अभिमानाने उंचावणारी आहे.
पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना त्यांच्या समूळ उच्चाटनाचा इशारा दिला होता. पहेलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी अनेक महिलांच्या पतींना त्यांच्या डोळ्यासमोर ठार मारून त्यांचे कुंकू पुसले होते.
या पुसल्या गेलेल्या कुंकवाची अर्थात सिंदूरची किंमत दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधानासह केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी दिला होता. त्या अनुषंगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे समर्पक नाव देऊन पाकिस्तान मधील ९ दहशतवादी ठिकाणांना भारताने उध्वस्त केले. बंकरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा समूळ नाश करत त्यांना चांगला धडा शिकवला गेला. जगाचे लक्ष वेधणारी ही कारवाई यशस्वी झाल्यानंतर आणखी एक समर्पक कृती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची प्रसार माध्यमांना माहिती देण्याचे उत्तरदायित्व संरक्षण दलातील आघाडीच्या कर्तबगार महिला अधिकाऱ्यांवर सोपवली.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सर्वप्रथम या लष्करी कारवाईची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. यामुळे भारताच्या सैन्य दलामध्ये नारी शक्तीला कसे महत्त्व दिले जाते याचे प्रत्यंतर देशाला आले. ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईबाबत तपशीलवार माहिती भारतासह जगभरातील प्रसिद्धी माध्यमांना देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या स्नुषा अर्थात सूनबाई आहेत आणि ही बाब बेळगाववासियांसाठी अभिमानाची आहे.
पती-पत्नी दोघेही भारतीय सैन्यात
ऑपरेशन सिंदूरच्या सैन्य कारवाईची जगसमोर माहिती सांगणाऱ्या कर्नल सुफिया कुरेशी या बहुराष्ट्रीय सैन्य दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी आहेत, हे मोठे यश आहे. सोफियाचे पती बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावाचे आहेत. पती-पत्नी दोघेही भारतीय सैन्यात कर्नल पदावर सेवा बजावत आहेत. सोफियाचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांचा २०१५ मध्ये सोफिया यांच्याशी प्रेमविवाह झाला. कर्नल सोफिया मूळतः गुजरात राज्यातील बडोद्याच्या आहेत. सध्या सोफिया जम्मू मध्ये कर्नल पदावर सेवा बजावत असून त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी झाशीमध्ये कर्नल आहेत