मोठी घसरण झाल्याने सर्वच व्यवहार थांबवले
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या शेअर बाजारात गुरुवारी ८ मे रोजी मोठी घसरण झाली. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने केलेल्या कारवाईनंतर, कराची स्टॉक एक्स्चेंजचा एएसई-१०० निर्देशांक ६.३२टक्क्यांनी घसरला. यामुळे व्यापार एक तासासाठी थांबवण्यात आला.
या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे भारताने केलेल्या लष्करी कारवाई आहे. तसेच आज दुपारी १२ च्या सुमारास पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली . या घडामोडींमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच नाजूक स्थितीत असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर सर्वार्थाने अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीत, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावामुळे तेथे आर्थिक अस्थिरता वाढू शकते, यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे . दरम्यान, भारताच्या शेअर बाजारावर याचा फारसा परिणाम झाला नाही. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी निर्देशांकांनी सौम्य घसरण नोंदवली. पण, सध्या भारतीय बाजार स्थिर आहे.
पाकिस्तानच्या पाच शहरांत ड्रोन हल्ले
पाकिस्तानातील लाहोर-कराची, गुजरांवाला, घोटकी आणि चक्रवाल येथे ड्रोनने हल्ले झाले आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. लाहोरवरील हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे चार सैनिक जखमी झाले आहेत, तर मियानोमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लाहोर, रावळपिंडी आणि कराचीसह अनेक ठिकाणीही ड्रोन हल्ले झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने ९ ठिकाणी किमान १२ भारतीय ड्रोन पाडण्यात यश मिळवले आहे. अशी माहिती, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली. बुधवारी भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर चौधरी यांची ही तिसरी पत्रकार परिषद होती.