कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाहीत आवश्यक दोन तृतीयांश मते.
व्हॅटिकन : पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर रोमन कॅथोलिक चर्चच्या २६७ व्या पोपच्या निवडीसाठी व्हॅटिकनमध्ये सुरू झालेल्या 'पापाल कॉन्क्लेव्ह'च्या पहिल्या दिवशी योग्य व्यक्तीची निवड करण्यात जगभरातील १३३ कार्डिनल्सना अपयश आले. ७ मे २०२५ रोजी झालेल्या पहिल्या मतदान फेरीत १३३ कार्डिनल्सनी भाग घेतला, मात्र कोणत्याही उमेदवाराला आवश्यक दोन तृतीयांश बहुमत म्हणजेच ८९ मते मिळाली नाहीत. परिणामी, चर्चच्या परंपरेनुसार सिस्टिन चॅपलमधून काळा धूर सोडण्यात आला. पोपची निवड अद्याप झाली नाही हे सांगण्यासाठी चिमणीतून कला धूर सोडण्यात आला.
दरम्यान आज गुरुवार ८ मे रोजी सकाळी दोन आणि दुपारी दोन अशा चार फेऱ्या होणार आहेत. नव्या पोपची निवड होईपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. नवीन पोपसाठी होणारे मतदान अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडते. कॉन्क्लेव्हपूर्वी सर्व कार्डिनल्सनी गोपनीयतेची शपथ घेतली असून त्यांचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
पोप फ्रान्सिस यांचे २१ एप्रिल रोजी निधन झाले होते. अशा परिस्थितीमध्ये १५ ते २० दिवसांच्या आत 'पापाल कॉन्क्लेव्ह' घेणे आवश्यक असते . मतदानादरम्यान कोणालाही ८९ मते मिळाली नाहीत, तर मतपत्रिका जाळून काळा धूर सोडला जातो. जर एखाद्या उमेदवाराला बहुमत मिळाले तर पांढरा चिमणीमधून धूर निघतो आणि नव्या पोपच्या निवडीची घोषणा केली जाते.
पोप कॉन्क्लेव्हच्या इतिहासातील सर्वात जास्त आणि सर्वात कमी वेळ चाललेल्या निवडणुका :
सर्वात जास्त काळ चाललेली पोप निवडणूक १३व्या शतकात झाली. नोव्हेंबर १२६८ पासून सप्टेंबर १२७१ पर्यंत – जवळपास तीन वर्षे चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर पोप क्लेमेंट (चौथे) यांचा उत्तराधिकारी म्हणून पोप ग्रेगरी (दहावे) यांची निवड झाली. या विलंबाला अंतर्गत मतभेद व राजकीय हस्तक्षेप जबाबदार होते. यानंतरच मतदान प्रक्रिया बंद खोलीत होण्याची परंपरा सुरु झाली.
दुसरीकडे, आतापर्यंतची सर्वात जलद निवड १५०३ मध्ये झाली होती. फक्त १० तासांत पोप पायस (तिसरे) यांची निवड करण्यात आली. १७४० मध्ये पोपच्या निवडणुकीसाठी ७ महिने लागले होते. २१व्या शतकात आतापर्यंत दोन पोप निवडले गेले आहेत. २००५ मध्ये पोप बेनेडिक्ट (३ दिवस, मतदानाच्या ४ फेऱ्यांनंतर) आणि २०१३ मध्ये पोप फ्रान्सिस (२ दिवस, मतदानाच्या ५ फेऱ्यांनंतर) यांची निवड झाली.
सध्या सुरू असलेल्या कॉन्क्लेव्हमध्ये संभाव्य पोप पदासाठी फिलीपिन्सचे कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगले, आफ्रिकेचे कार्डिनल पीटर टर्क्सन आणि इटलीचे कार्डिनल मॅटेओ झुप्पी यांची नावे चर्चेत आहेत. या प्रक्रियेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.