कला अकादमीतील खुले सभागृह नव्याने उभारा!

मुख्यमंत्र्यांचे ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांना निर्देश


4 hours ago
कला अकादमीतील खुले सभागृह नव्याने उभारा!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नव्या सल्लागाराची नेमणूक करून कला अकादमीतील खुल्या सभागृहाची पुन्हा उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे खात्याने सल्लागार निवडीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
सांस्कृतिकदृष्ट्या गोव्यासह जगभर प्रसिद्ध असलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर नूतनीकरणाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी आमदारांनी सरकार आणि मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्यावर सुरू केला. विधानसभा सभागृह आणि सभागृहाबाहेरही विरोधकांनी यावरून रान पेटवलेले असतानाच जुलै २०२३ मध्ये कला अकादमीतील खुल्या सभागृहाचे छत कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले; परंतु खुले सभागृह कला अकादमीचा भाग नसल्याचे सांगून सरकारने विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अकादमीच्या नाट्यगृहांतील त्रुटींबाबत ‘पीडब्ल्यूडी’ने नियुक्त केलेल्या तिन्ही सल्लागारांनी अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत खुल्या सभागृहाचा विषयही चर्चेला आला. त्यावेळी नव्या सल्लागाराची नेमणूक करून खुले सभागृह उभारण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्याचेही​ सूत्रांनी सांगितले.       

हेही वाचा