चांदेल प्रकरणात आयोगाची शिफारस
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : स्वत:च्या मालकीच्या किंवा भाटकारांच्या जमिनीत अनेक वर्षांपासून शेती करीत असलेल्या एससी (अनुसूचित जाती) किंवा एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील व्यक्तींना कोणीही अडथळा आणू शकत नाही. त्यांना संबंधित जागांवर शेती करण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी शिफारस राज्य एससी आणि एसटी आयोगाने एका प्रकरणाच्या निवाड्यानंतर केली आहे.
चांदेल येथील साजगो जाधव यांनी सातेरी देवस्थानचे अध्यक्ष अनंत गावस आणि दत्ताराम गावस यांच्याविरोधात आयोगाकडे धाव घेतली होती. चांदेलमधील १/२, १/३, १/४, १/५ आणि ११२/१ या सर्व्हे क्रमांकातील जमिनीमध्ये आपण अनेक वर्षांपासून शेती करत आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून अनंत गावस आणि दत्ताराम गावस यांच्याकडून आपली अडवणूक होत असल्याचा दावा त्यांनी एससी आणि एसटी आयोगात दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. त्यांच्या याचिकेवर गेल्या काही महिन्यांपासून सुनावण्या सुरू होत्या. अखेर आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर यांनी नुकताच याबाबत अंतिम निवाडा जाहीर केला आणि साजगो जाधव कसत असलेल्या सर्व्हे क्रमांकातील जमिनीत अनंत गावस आणि दत्ताराम गावस यांना लुडबूड करता येणार नाही. एससी आणि एसटी प्रवर्गातील नागरिक स्वत:च्या किंवा भाटकारांच्या जमिनीत अनेक वर्षांपासून शेती करत असतील, तर त्यांना रोखता येऊ शकत नाही, असे म्हटले आहे.