शेखाप्पा लमाणीने बहिणीचा केला होता बॅटचे प्रहार करून खून
पणजी : सर्व साक्षीदार संशयिताच्या ओळखीचे असल्यामुळे तो साक्षीदारांना धमकावू शकतो अशी शक्यता आहे. तसेच बहिणीचा खून केल्यानंतर संशयित पसार झाला होता, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित शेखाप्पा लमाणी (मूळ गदग -कर्नाटक) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला आहे.
या प्रकरणी हणजूण पोलिसांनी ११ जून २०२१ रोजी हेमाप्पा लमाणी याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. संशयित शेखाप्पा लमाणी याने फुलडेवाडा नागवा येथे क्रिकेट बॅटच्या सहाय्याने थोरली बहीण अनासुया लमाणी हिचा खून केल्याचे म्हटले होते. सदर घटना ११ जून २०२१ रोजी सायंकाळी समोर आली. अनासुयाच्या बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारी भाडेकरूंनी घर मालकाला दिली होती. घरमालकाने घटनेची माहिती हणजूण पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सूरज गावस, तत्कालीन उपनिरीक्षक अमीर तरल, महेश केरकर व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता कुजलेल्या अवस्थेत अनासुयाचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्याच्या चेंदामेंदा होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. क्रिकेट बॅट तिथे होती. बॅटलाही रक्त लागले असल्याने बॅटनेच तिचा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी हेमाप्पा लमाणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. अनासुयाचा धाकटा भाऊ शेखाप्पा लमाणी गायब झाल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता, त्यानेच तिचा खून केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित करून खटला सुरू केला. शेखाप्पा लमाणी याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ४४ पैकी फक्त ५ साक्षीदारांची उलटतपासणी झाली आहे. त्यामुळे खटल्याला उशीर होणार असल्याचा दावा केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित साक्षीदारांना ओळखत असून त्याच्यावर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसेच तो खून केल्यानंतर फरार झाला होता, असा दावा सरकारी वकिलाने करून त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित शेखप्पा लमाणी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
खुनानंतर झाला होता फरार
पोलिसांनी हेमाप्पा लमाणीच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, अनासुयाचा धाकटा भाऊ शेखाप्पा लमाणी गायब झाल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता, त्यानेच तिचा खून केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.