🛰️ नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणासाठी आणि सामरिक गरजांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे किमान १० उपग्रह सातत्याने कार्यरत असून, हे उपग्रह २४ तास देशाच्या सीमांची आणि विविध धोरणात्मक भागांची निगराणी ठेवतात, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.
🎓 इंफाळ येथील सेंट्रल ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या पाचव्या पदवीप्रदान समारंभात नारायणन यांनी उपस्थितांना संबोधित करताना इस्रोच्या उपग्रह आणि तंत्रज्ञानविषयक महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. "आपण ज्या भौगोलिक स्थितीत आहोत, त्यानुसार आपल्याला सागरी किनारपट्टीचे (७,००० किमी) आणि संपूर्ण उत्तर सीमेचे सतत निरीक्षण करावे लागते. आपल्या शेजारील देशांमधून येणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत आवश्यक आहे", असे नारायणन म्हणाले.
🔭 ड्रोन आणि उपग्रह तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका
उपग्रह आणि ड्रोन यांसारखी उच्च तंत्रज्ञानाची साधने वापरल्याशिवाय या प्रकारचे व्यापक आणि सातत्याचे निरीक्षण शक्य नाही. ही तंत्रे केवळ संरक्षणासाठीच नाही, तर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, सीमावर्ती हालचालींचे निरीक्षण आणि धोरणात्मक निर्णयांसाठीही उपयुक्त आहेत, असे ते म्हणाले.
⚠️ सध्याच्या परिस्थितीत उपग्रह आणि ड्रोनचे महत्त्व वाढले
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबार, ड्रोन हल्ले आणि अन्य कारवाया होत असल्याने देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर करावी लागत आहे. अशा परिस्थितीत प्रगत उपग्रह तंत्रज्ञान भारताला शत्रूंच्या कोणत्याही हालचालींची लवकर ओळख पटवून त्वरित प्रतिक्रिया देण्यास मदत करते.
⚔️ इस्रोची सामरिक भूमिका वाढतेय
या पार्श्वभूमीवर इस्रोची भूमिका केवळ संशोधन आणि अवकाश विज्ञानापुरती मर्यादित न राहता आता सामरिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची ठरू लागली आहे. संरक्षण क्षेत्रात इस्रोचे योगदान दिवसेंदिवस वाढत आहे.
🛡️ संरक्षण आणि सामरीक क्षेत्रात वाढतेय इस्रोचे महत्त्व
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून चालू असलेल्या गोळीबारानंतर ११ आणि १२ मेच्या रात्री सीमावर्ती भागात शांतता नोंदवण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
✈️ त्यानंतर पाकिस्तानकडून जोरदार हवाई हल्ले, गोळीबार आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे हे हल्ले निष्फळ ठरले.
🎯 दरम्यान भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानमधील ११ हवाई तळ नष्ट केल्याचे रविवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भारत-पाक डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यात झालेल्या चर्चेनंतर १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधी जाहीर झाली होती.
⚠️ सैन्याच्या महासंचालकाचे महत्त्वपूर्ण विधान
"आम्ही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून जी परिस्थिती आहे, ती युद्धापेक्षा कमी नाही. दोन्ही देशांमध्ये शनिवारी युद्धविरामाचा निर्णय झाला; पण या सामंजस्य कराराचेही उल्लंघन झाले. पुढे काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही" - डीजीएमओ राजीव घई