दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ
इस्लामाबाद: दोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शवली. मात्र त्यानंतरही पाकिस्तानने 'ना पाक हरकती' सुरूच ठेवल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथून आत्मघातकी स्फोट झाल्याची बातमी येत आहे. या आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.
पेशावरमधील चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिंग रोडवरील गुरांच्या बाजाराजवळ आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या मोबाईल व्हॅनवर हल्ला केला, असे एसएसपी मसूद बंगश यांनी सांगितले.
दरम्यान हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. सध्या याचा तपास सुरू आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
यामुळे सुरक्षा कारवाया देखील करण्यात आल्या आहे. दहशतवाद्यांनकडून पाकिस्तानच्या मुख्य शहरांना लक्ष्य केले जात आहे. विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हल्ले वाढले आहेत. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि घटनेचा सविस्तर अहवाल मागवला.