क्रिकेट चाहत्यांना आठवड्यातील दुसरा मोठा धक्का
मुंबईः भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटची निवृत्ती ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका आठवड्यातील दुसरा मोठा धक्का आहे. कसोटी क्रिकेटला अलविदा करत फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा निर्णय कोहलीने घेतला आहे.
कोहलीने १२३ कसोटी सामन्यांत ३० शतके व ३१ अर्धशतके झळकावत ९२३० धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. मात्र त्याने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
विराटची भावूक पोस्ट-
विराटने आपल्या निवृत्तीबाबत माहिती देताना असे म्हटले आहे की, '१४ वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती.
या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर उपयोगी येतील असे धडे शिकवले. कसोटी फॉरमॅटमध्ये खेळण्यात वैयक्तिक गुणांची कसोटी लागते. या फॉरमॅटमध्ये स्वतःला शांत ठेवून कसे खेळायचे हे मी शिकलो, पाच दिवसांच्या खेळात प्रत्येक दिवस आपली परीक्षा घेतो.
बीसीसीआयचा फेरविचाराचा सल्ला, मात्र विराट निर्णयावर ठाम-
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र,येत्या जून महिन्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा पाहता बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती.
मात्र, विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर आज त्याने १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. विराटच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.