बैठकीत संरक्षण मंत्री, सीडीएस, एनएसए, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, आयबी आणि रॉचे प्रमुख उपस्थित
नवी दिल्ली : शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धबंदीनंतर, पाकिस्तानने अवघ्या दोन तासांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पुन्हा सीमावर्ती भागात हल्ला केला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, एनएसए अजित डोभाल तसेच आयबी आणि रॉचे प्रमुख यामध्ये उपस्थित आहेत.
दुसरीकडे, रविवारी सकाळी राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात परिस्थिती सामान्य दिसून आली. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथील बागलिहार आणि सालार धरणांचे दरवाजे सरकारने उघडले. सध्या राज्य तपास विभागाची जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात छापेमारी सुरू आहे. ऑपरेशननंतर याबद्दल अधिकृत माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांद्वारे दिली जाईल.
शनिवारी संध्याकाळी ५ वाजता, म्हणजेच केवळ ३ तासांनी, पाकिस्तानने शस्त्रसंधी भंग केला. जम्मू आणि काश्मीर, गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ले झाले. भारतीय सैन्याने ते हाणून पाडले. ही माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रात्री ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली. शस्त्रबंदीवर सहमती झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा त्याचे उल्लंघन केले. यावर कठोर आणि ठोस कारवाई करण्याचे निर्देश भारतीय लष्कराला देण्यात आले आहेत.
काही काळानंतर, पाकिस्तानकडून होणारे गोळीबार आणि ड्रोन हल्ले थांबले. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाबमधील अनेक भागात अजूनही रेड अलर्ट आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. पहलगाम हल्ल्याच्या दिवसापासून, २२ एप्रिलपासून १० मे पर्यंत, पाकिस्तानी गोळीबारात ५ सैनिक शहीद झाले आहेत, तर ६० जवान जखमी झाले आहेत. याशिवाय २५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
काही वेळातच संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद
संरक्षण मंत्रालय लवकरच पत्रकार परिषद घेऊ शकते. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कमांडर रघु नायर माध्यमांना संबोधित करतील.