सद्यस्थितीत पाकिस्तानसोबत युद्धाची गरज होतीच!

युद्धविराम आवश्यक नव्हता : गोव्यातील माजी सैनिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त


21 hours ago
सद्यस्थितीत पाकिस्तानसोबत युद्धाची गरज होतीच!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पाकिस्तानने नेहमीच भारतासोबत दगाबाजी केली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ होती. त्यांचे दहशतवादी भारतात येऊन निष्पापांचे जीव घेत असतानाही केंद्र सरकारने युद्धाला विराम देण्याची गरज नव्हती, अशा प्र​ति​क्रिया राज्यातील माजी सैनिकांनी रविवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.
पाकिस्तानने नेहमीच भारतासोबत आगळीक केली आहे. त्यांच्या सरकारने दिलेला शब्द कधीही न पाळल्याचा इतिहास आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचे दहशतवादी भारतात घुसून भारतीय जवानांसह निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथेही त्यांनी अनेक पर्यटकांना ठार केले. या घटनेमुळे पाकिस्तानला कोणतीही दयामाया दाखवण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया नौसेनेचे मा​जी अधिकारी रामदास महाले यांनी दिली. सध्याच्या स्थितीत केंद्र सरकारला इतक्या लवकर युद्धविरामाची घोषणा करण्याची गरज नव्हती. भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात पाकिस्तानचाच हात असतो. त्यामुळे पाकिस्तानसोबत युद्ध छेडून त्यांना कायमची अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ होती, असेही त्यांनी नमूद केले.
आतापर्यंतचा ​इतिहास तपासल्यास पाकिस्तान किती विश्वासघातकी देश आहे, हे वारंवार समोर आले आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. दहशतवाद नष्ट करणे हीच भारताची आतापर्यंतची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे हीच संधी साधून पाकिस्तानातील सर्वच दहशतवादी तळांवर अधिकाधिक हल्ले करून तेथील दहशतवाद्यांचा खात्मा करणे महत्त्वाचे होते, असे भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी अनिल बोंद्रे म्हणाले. पाकिस्तानला पुढील अनेक वर्षे डोके वर काढता येऊ नये, अशा कारवाया भारताने करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
युद्ध हवे ही लोकांची भावना : वामन नाईक
पाकिस्तान ज्या पद्धतीने भारतावर दहशतवादी हल्ले घडवत आहे, ते पाहता या स्थितीत भारताने पाकिस्तानसोबत युद्ध छेडायला हवे, अशी भावना तमाम भारतीयांची होती. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान जाणीवपूर्वक भारतात दहशतवादी हल्ले घडवत आहे. त्यात सध्याच्या स्थितीत भारत युद्धाच्या दृष्टीने पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे आतातरी पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचेच आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय सैन्य दलातील माजी अधिकारी कॅप्टन वामन नाईक यांनी दिली.