मान्सून गोव्यात १ ते २ जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता

केरळमध्ये २७ मेपर्यंत दाखल होण्याचा अंदाज : गतवर्षी ४ जून रोजी मान्सूनचे आगमन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th May, 11:17 pm
मान्सून गोव्यात १ ते २ जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता
🌧️पणजी: यंदा मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता असून, अनुकूल वातावरणामुळे येत्या २७ मे २०२५ पर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केला आहे. ⏱️केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे ४ ते ५ दिवसांनी तो गोव्यात पोहोचतो. 📅त्यामुळे, केरळातील आगमनाचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास, गोव्यात मान्सूनचे आगमन १ ते २ जून दरम्यान होण्याची शक्यता आहे.

📆मागील वर्षी राज्यात ४ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. 🌬️काही वेळेस अनुकूल वातावरण नसल्याने मान्सून केरळ मधून गोव्यात पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा उशीर देखील होऊ शकतो.

🌡️तापमानाची स्थिती
शनिवारी राज्यातील कमाल तापमानात वाढ दिसून आली. 🏙️पणजीत कमाल ३५.२ अंश तर किमान २६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 🏖️मुरगाव मधील कमाल तापमान ३४.८ अंश व किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहीले. 🌦️रविवार, ११ मे रोजी राज्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. 📈पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३५ अंश तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानात मोठा बदल होणार नसल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.
💧मान्सूनपूर्व पावसाची स्थिती
राज्यात १ मार्च ते १० मे दरम्यान सरासरी १३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 📉यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस सरासरीच्या तुलनेत १६.५ टक्क्यांनी कमी आहे. 🏆या काळात राज्यात धारबांदोडा येथे सर्वाधिक ३२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 🏝️यानंतर साखळीत २८.२ मिमी, सांगेत २४.६ मिमी, फोंड्यात २३.६ मिमी तर वाळपई येथे २२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
⚠️मच्छीमारांसाठी चेतावणी
राज्यात १२ ते १४ मे दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी या काळात समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

🔬 मान्सून अंदाजामागील शास्त्र

हवामान खात्यातर्फे मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याचा अंदाज बांधण्यासाठी सहा विविध मॉडेलचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. 📅खात्यातर्फे २००५ पासून असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. २०१५ वगळता खात्याचे अन्य सर्व अंदाज अचूक ठरले होते. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून केरळात २३ मे रोजी दाखल झाला होता, जो गेल्या १६ वर्षांतील सर्वात लवकरचा आगमन होता. 🏆यंदाचा २७ मे चा अंदाज खरा ठरल्यास, हा गेल्या १६ वर्षातील मान्सूनचे केरळातील दुसरे लवकर आगमन ठरणार आहे.

📊मान्सून दाखल होण्याची तारीख
वर्ष केरळ गोवा
२०१८ २९ मे ७ जून
२०१९ ८ जून २० जून
२०२० १ जून ११ जून
२०२१ ३ जून ५ जून
२०२२ २९ मे १० जून
२०२३ ८ जून ११ जून
२०२४ ३० मे ४ जून