दोनदा परीक्षा देणाऱ्यांचे प्रथम परीक्षेतील गुणच ग्राह्य

कर्मचारी भरती आयोगाकडून स्पष्ट


21 hours ago
दोनदा परीक्षा देणाऱ्यांचे प्रथम परीक्षेतील गुणच ग्राह्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठीची दुसरी सीबीटी परीक्षा (सीबीटी - ३) असो किंवा अन्य कोणतीही परीक्षा, एका उमेदवाराने दोनदा दिली असेल तर संबंधित उमेदवाराने प्रथम दिलेल्या परीक्षेतील गुणच ग्राह्य धरले जातील. गोवा कर्मचारी भरती आयोगाने नोटीस जारी करून ही सूचना दिली आहे. एलडीसी पदासाठी झालेली सीबीटी परीक्षा ३० उमेदवारांनी दोनवेळा दिली. यामुळे आयोगाने ही बाब स्पष्ट केली आहे.
एलडीसी पदासाठीच्या दोन्ही सीबीटी परीक्षा पार पडल्या असून निकालही जाहीर झाले आहेत. ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठीची दुसरी सीबीटी परीक्षा (सीबीटी ३) २५ मे रोजी होणार आहे. काही उमेदवार विविध गटांसाठी (सर्वसामान्य, इडब्लूएस) स्वतंत्रपणे अर्ज सादर करतात. वेगवेगळी अॅडमिट कार्ड जारी झाल्याने ते दोनवेळा (प्रत्येक गटासाठी एकदा) परीक्षेला बसतात. अशा उमेदवारांचे प्रथम दिलेल्या परीक्षेतील गुणच ग्राह्य धरले जातील, असे आयोगाने कळविले आहे. उदेवारांनी शक्यतो दोनवेळा परीक्षेला बसू नये. दोन अर्ज भरल्याने अॅडमिट कार्ड दोन मिळाली असली तरी दोनवेळा परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही.
एलडीसी पदासाठीच्या सीबीटी परीक्षेला ३० उमेदवार दोनवेळा बसले. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने ही परीक्षा विविध ठिकाणी अधिक दिवस घ्यावी लागली. यामुळे काही उमेदवारांना दोनवेळा परीक्षा देणे सहजशक्य झाले, अशी माहिती कर्मचारी भरती आयोगाचे सचिव शशांक ठाकूर यांनी दिली.