मृतांच्या कुटुंबियांना १५ मेनंतर मिळणार रक्कम
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शिरगाव चेंगराचेंगरी दुर्घटनेला आठवडा उलटून गेला तरी अद्याप पीडितांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. वैद्यकीय अहवालासह जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच भरपाई मिळणार आहे. बारा दिवसांनंतर म्हणजे १५ मेनंतरच भरपाई मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिरगावमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, तर जखमींना १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेदिवशीच केली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची भरपाई दिली जाणार आहे. अार्थिक मदत मिळू शकणाऱ्या जखमींची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. वैद्यकीय अहवालावर ते अवलंबून आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांच्या दुखापतीचे स्वरूप याविषयी डॉक्टर वैद्यकीय अहवाल देतील. त्यावर आधारित भरपाई मिळेल.
मृत्यू झालेल्या सहापैकी तिघे थिवी मतदारसंघातील आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. बारा दिवस झाल्यानंतर आर्थिक मदत देणे योग्य ठरेल, असे मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. जखमींना १ लाखाची मदत मिळणार आहे. त्यासाठी जखमींची निवड कशी करायची याचे निकष ठरत आहेत. याबाबत मुख्यमंंत्र्यांसोबत मी चर्चा करणार आहे, असेही मंत्री हळर्णकर म्हणाले.
जखमींना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसाठी वैद्यकीय अहवालासाेबत जिल्हाधिकाऱ्यांचा अहवालही आवश्यक आहे. जखमींची आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना किती खर्च येईल, याबाबत जिल्हाधिकारी अहवाल देतील. दुखापतीचे स्वरूप याबाबत हॉस्पिटल अहवाल देईल, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले. जखमींना लवकर मदत मिळण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे, असेही आमदार डॉ. शेट्ये म्हणाले.
तिन्ही जखमींचे व्हेंटिलेटर काढले
शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी होऊन गोमेकॉत उपचार घेत असलेल्या तीनही भाविकांचे व्हेंटिलेटर आता काढण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी तरी धोका दूर झालेला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. उदय काकोडकर यांनी दिली.
शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेत ३ मे रोजी पहाटे चेंगराचेंगरी होऊन ६ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे ७० भाविक जखमी झाले होते. गोमेकॉत तिघांवर उपचार सुरू असून उर्वरितांना डिस्चार्ज मिळाला आहे. दुर्घटनेनंतर जखमींना उपचारासाठी साखळी, डिचोली आरोग्य केंद्रांत, तसेच आझिलो हॉस्पिटल आणि गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पहिल्या दिवशी १३ जखमींना गोमेकॉत दाखल केले होते. नंतर अाझिलोमधून ६ जखमींना पुढील उपचारासाठी गोमेकॉत आणले होते. सुरुवातीला चार जखमी भाविक व्हेंटिलेटरवर होते. दोन दिवसांनंतर एकाचा व्हेंटिलेटर काढण्यात आला होता. रविवारी उपचार घेणा ऱ्यांपैकी तिघांचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे. अधिक दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यामुळे काही अवयव निकामी होण्याचा धोका असतो. व्हेंटिलेटर काढल्यानंतर ते भाविक उपचारांना प्रतिसाद देत आहेत; मात्र आरोग्याविषयीचा त्यांचा धोका पूर्ण टळलेला नाही, असे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले.