पाकिस्तानी सैन्यही घुसखोरीच्या प्रयत्नात !

डीजीएमओ राजीव घई यांचा गौप्यस्फोट : पाकिस्तानचे ४० जवान ठार; १०० दहशतवादी यमसदनी


20 hours ago
पाकिस्तानी सैन्यही घुसखोरीच्या प्रयत्नात !

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : भारताला जी कारवाई करायची होती, ती केली आहे. सामान्य परिस्थितीत दोन देशांचे हवाई दल एकमेकांवर हल्ले करत नाहीत. दररोज रात्री गोळीबार होत नाही. एरवी घुसखोरीचा प्रयत्न दहशतवादी करत असतात; पण यावेळी पाकिस्तान सैन्याची तुकडी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असा गौप्यस्फोट भारतीय सैन्य संचालनालयाचे महासंचालक (डीजीएमओ) राजीव घई यांनी केला.
रविवारी सायंकाळी भारताच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. डीजीएमओ राजीव घई, हवाई दल आणि नौदलाचे महासंचालकांनी संरक्षण दलांच्या कारवायांची माहिती दिली. संरक्षण दलाने उध्द्वस्त केलेल्या तळांचे व्हिडिओच पुरावे म्हणून जगासमोर मांडले. आम्ही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून जी परिस्थिती आहे, ती युद्धापेक्षा कमी नाही. दोन्ही देशांमध्ये शनिवारी युद्धविरामाचा निर्णय झाला; पण या सामंजस्य कराराचेही उल्लंघन झाले. पुढे काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे सूचक विधानही घई यांनी केले.

पाकिस्तानने लहान ड्रोन आणि यूएव्हीद्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्ट्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचे ३० ते ४० सैनिक आणि अधिकारी मारले. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे पाच जवानही हुतात्मा झाले, अशी माहिती राजीव घई यांनी दिली.
घई पुढे म्हणाले, भारताकडून होणाऱ्या प्रत्युत्तर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला, परंतु आम्ही कोणत्याही नागरी विमानाला लक्ष्य केले नाही, फक्त पाकिस्तानमधील लष्करी तळांना लक्ष्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश फक्त पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करणे, हे होते. त्यात आम्हाला मोठे यश मिळाले. भारताकडून दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. या आक्रमणात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यामध्ये कंधार अपहरण आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेला युसूफ अझहर, अब्दुल मलिक आणि मुदस्सीर अहमद यांसारखे दहशतवादीही ठार झाले.
युद्धविराम मोडल्यास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर
राजीव घई पुढे म्हणाले की, शनिवारी दुपारी ३.३५ वा. मी पाकिस्तानच्या डीजीएमओशी संपर्क केला. पाकिस्तानच्या डीजीएमओने सुचविल्यानुसार १० मे रोजी सायं. ५ पासून दोन्ही देशांमधील युद्धविराम घोषित झाला. आम्ही १२ मे रोजी पुन्हा चर्चा करण्याचे ठरवले होते; मात्र पाकिस्तानने लगेच या करारांचे उल्लंघन केले. त्यांनी भारतीय सीमेत गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले. भारतीय सैन्याने यालाही जाेरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला एक हॉटलाईन संदेश पाठवला आहे. त्यांना इशारा दिला की, जर पाकिस्तानने पुन्हा युद्धविरामचे उल्लंघन केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

जशास तसे उत्तर देणारच : नौदलाचे व्हाइस अॅडमिरल

युद्ध टाळून शांतता प्रस्थापित करणे, स्थैर्य कायम ठेवणे, हे आमचे ध्येय आहे. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तुम्ही भारतविरोधी कारवाया केल्या तर आम्ही जशास तसे उत्तर देणारच, असे नौदलाचे व्हाइस अॅडमिरल ए. ए. प्रमोद यांनी ठणकावून सांगितले.

सीमेवरील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर
भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती रविवारी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले. सकाळी बाजारपेठेतील काही दुकाने उघडली होती. दैनंदिन व्यवहार सामान्य होत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या दिवशी, २२ एप्रिलपासून ते १० मे पर्यंत पाकिस्तानी गोळीबारात ६ सैनिक हुतात्मा झाले, तर ६० जण जखमी झाले. याशिवाय २५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.