ग्रामस्थ आक्रमक :पंचायतीच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
पेडणे : मोरजी ग्रामसभेमध्ये नागरिकांनी जोरदार प्रश्न उपस्थित करत पंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. रशियन भाषेतील फलक हटवण्याची मागणी, २५ मीटर रुंदीच्या रस्त्यांना विरोध, किनारी पार्किंग कायदेशीर करण्याची आवश्यकता आणि अनेक नागरिकांच्या समस्या यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या.
ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले की मोरजी परिसरात अनेक व्यावसायिक पुन्हा एकदा रशियन भाषेतील फलक लावत आहेत, जे स्थानिक संस्कृतीला धरुन नाहीत. यावर सरपंच पवन मोरजे यांनी संबंधित व्यावसायिकांना सूचना देऊन इंग्रजी, मराठी व कोकणी भाषेतील फलक लावण्यास सांगणार असल्याचे आश्वासन दिले.
मोरजी-तेमवाडा किनाऱ्यावर ९ कोटींचा पार्किंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. ग्रामस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली की सर्व कायदेशीर परवाने घेऊनच हा प्रकल्प उभारावा. यावर अनंत शेटगावकर यांनी विचारले की, किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसाठी कोणती व्यवस्था करण्यात येणार आहे?
गोविंद पोके यांनी गावात २५ मीटर रुंदीच्या रस्त्याची आवश्यकता का? असा सवाल उपस्थित केला. यावर सरपंचांनी सांगितले की, आतापर्यंत कोणी याला आक्षेप घेतला नव्हता. मात्र, जर ग्रामस्थ याला विरोध करत असतील, तर तसा ठराव करून तो संबंधित खात्याकडे पाठवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी समस्या, वाचनालयाची दुरवस्था
सुभाष शेटगावकर यांनी मरडीवाड्यात गेली पाच वर्षे नळाला पाणी येत नाही, अशी तक्रार केली. त्याचबरोबर, पंचायत वाचनालयात फक्त वर्तमानपत्रेच उपलब्ध आहेत, इतर पुस्तके का नाहीत? असा सवालही त्यांनी केला.
पंचायत कर्मचारी वेळेवर हजर राहत नाहीत, यावर सचिव व पंच सदस्यांनी नियंत्रण ठेवावे, मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज, खासगी वाहने भाडेपट्टीवर देणाऱ्या मालकांवर काय कारवाई होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. वाहतूक खात्याशी संपर्क साधून यावर पुढील पावले उचलण्याची तयारी असल्याचे सरपंचांनी सांगितले.
ग्रामसभेतील कमी उपस्थितीवर नाराजी
दिलीप सावंत, अनंत शेटगावकर आणि सुभाष शेटगावकर यांनी ग्रामसभेला नगण्य उपस्थितीवर नाराजी व्यक्त करत, मोरजाई देवस्थान महाजनांची सभा आणि गावातील फेस्ट असल्याने ग्रामसभा पुढे ढकलावी अशी मागणी केली. सभेच्या शेवटी सरपंच पवन मोरजे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आणि उपस्थित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.