डिचोलीच्या कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

‘कला भवना’ची आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
डिचोलीच्या कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

डिचोली : ‘कलाकारांची भूमी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डिचोलीत अखेर सुसज्ज कला भवन उभारण्याचे स्वप्न साकार होणार आहे.६०० प्रेक्षक क्षमतेच्या या आधुनिक भवनाची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रविवारी पार पडणार आहे. डिचोलीतील प्रशासकीय संकुलाच्या आवारात हे कला भवन उभारले जाणार आहे.
वर्षानुवर्षे प्रलंबित मागणी अखेर मान्य
डिचोलीमध्ये रवींद्र भवन उभारण्यात यावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कलाकार, स्थानिक नागरिक सातत्याने करत होते. यापूर्वी काही प्रयत्न झाले, माजी मंत्री पांडुरंग राऊत यांच्या कार्यकाळातही ही प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु विविध कारणांमुळे ती पूर्णत्वाला जाऊ शकली नाही. त्यानंतर साखळी येथे रवींद्र भवन उभारण्यात आले. मात्र डिचोलीसाठी ही मागणी मात्र रखडली होती.
मुख्यमंत्री आणि आमदारांच्या प्रयत्नांना यश
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मागणी अखेर मान्य झाली असून, आगामी दोन वर्षांत हे कला भवन उभे राहणार आहे. त्यामुळे डिचोलीवासीय आणि स्थानिक कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
८० कोटींचा खर्च, आधुनिक सुविधा
या प्रशासकीय संकुल आणि कला भवनाच्या बांधकामासाठी एकूण ८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यातच कला भवन उभारण्यात येणार आहे. आमदार डॉ. शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भवनात ६०० प्रेक्षकांची आसन व्यवस्था, आधुनिक दर्जाची साऊंड सिस्टीम, वाचनालय, रवींद्र भवनच्या धर्तीवर सर्व सांस्कृतिक सुविधा अशा अनेक सुविधा असणार आहेत.
कलावंतांना मिळणार दर्जेदार मंच
हे कला भवन केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच नव्हे तर स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी, नाट्याविष्कार, संगीत, नृत्य, काव्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये दर्जेदार मंच उपलब्ध करून देणार आहे.
डिचोलीकर समाधानी
डिचोलीतील कलाकार आणि नागरिकांनी अनेक वर्ष ही मागणी सातत्याने लावून धरली होती. राजकीय विलंब, प्राधान्याचा अभाव यामुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता या सुसज्ज कला भवनाच्या रूपात त्याला मूर्त स्वरूप मिळणार असल्याने डिचोलीवासीयांत समाधानाचे वातावरण आहे.