संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून लष्कराच्या कारवाईबद्दल कौतुकोद्गार
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. आम्ही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही; मात्र पाकिस्तानने केवळ नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून योग्य प्रत्त्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत भारतीय लष्कराचा दरारा पोहोचला, असे कौतुकोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.
राजनाथ सिंह म्हणाले, भारताने पाकिस्तानात घुसून हल्ला केला. भारतविरोधी दहशतवाद्यांनी अनेक कुटुंबांचे कुंकू (सिंदूर) पुसले, त्यांना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. यासाठी संपूर्ण देश सैन्याचे अभिनंदन करत आहे.
सीमेपलीकडेही दहशतवादी सुरक्षित नाहीत
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ लष्करी कारवाई नाही, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. हे ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे, त्याच्या लष्करी सामर्थ्याच्या क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन आहे. आम्ही दाखवून दिले की, भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करतो, तेव्हा सीमेपलीकडेही दहशतवादी आणि त्यांना पोसणारे सुरक्षित राहू शकत नाहीत.