देवस्थान समितीचा निर्णय : नोटीस जारी
धोंडांच्या नोंदणीची माहिती देताना देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांना प्राणास मुकावे लागले व अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर प्रशासन देवस्थान समिती जागृत झाली असून देवस्थान समितीने यापुढे लईराई देवीच्या धोंडांनी रीतसर नोंदणी करावी व सर्वांनी सहकार्य करावे, अशी नोटीस काढली आहे. लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
देवीच्या धोंड भक्तांनी ओळखपत्रासह दोन पासपोर्ट आकाराचे फोटो देवस्थान समितिकडे सुपूर्द करून रीतसर नोंदणी करावी, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केले आहे. दरवर्षी धोंडांमध्ये वाढ होत असते. आता आम्ही नोंदणी सक्तीची केली असून त्यांना अधिकृत ओळखपत्र व इतर बाबतीत नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे धोंडांची निश्चित संख्याही समजेल. देवस्थान समितीने केलेल्या या आवाहनाला धोंड भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन दीनानाथ गावकर यांनी केले आहे.