नवी दिल्लीतून सरव्यवस्थापकाला अटक
पणजी : आसगाव येथील एका रेस्टॉरंटच्या सरव्यवस्थापकाने ४.३७ कोटींची अफरातफर करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी नवी दिल्ली येथून संशयित गुलशन कुमार सिंग (३२) याला अटक केली.
हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सुकून हॉस्पिटॅलिटीचे शिवकरण सिंग यांनी तक्रार दाखल केली आहे. सुकून हॉस्पिटॅलिटीचे आसगाव येथे एक रेस्टॉरंट सुरू आहे. तेथील आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी कंपनीने सरव्यवस्थापक म्हणून गुलशन कुमार सिंग याची नियुक्ती केली होती. दरम्यान, आॅगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संशयित गुलशन कुमार सिंग याने ग्राहकाचे बिल सिस्टममधून रद्द करुन १,८८,३५,५५३ रुपयांची अफरातफर केली. ही रक्कम त्याने आपल्या फायद्यासाठी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच दरम्यान गुलशन कुमार सिंग याने हाताळलेल्या रेस्टॉरंटच्या व्यवहारांची तपासणी केली असता, २,३८,६८ १८४ रुपये त्याच्या खासगी बँक खात्यात जमा केल्याचे समोर आले. संशयिताने वरील दोन्ही रक्कम मिळून कंपनीला ४ कोटी ३७ लाख ७३ हजार ७३७ रुपयांचा गंडा घातल्याचा दावा तक्रारदाराने केला. याची दखल घेऊन हणजूण पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी संशयित गुलशन कुमार सिंग याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१४, ३१६(४), ३१८(४) आर डब्ल्यू ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. दरम्यान, संशयित फरार झाल्याचे समोर आले. तसेच तो नवी दिल्ली परिसरात असल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल अनिकेत मांद्रेकर यांच्यासह पथक नवी दिल्लीत रवाना करण्यात आले. पथकाने शुक्रवार, दि. ९ रोजी संशयित गुलशन कुमार सिंग याच्या मुसक्या आवळून गोव्यात आणले. पोलिसांनी संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने संशयिताला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.