तिघांविरोधात गुन्हा नोंद : अटकपूर्व जामिनासाठी संशयितांची धाव
पणजी : अमेरिकेत नोकरीचे आमिष दाखवून गोव्यातील अनेक युवकांची २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा शाखेने अजय शिरोडकर, संकेत रामनाथकर आणि आवेश काकोडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वरील तिघांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहे.
गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नुवे येथील नितेश नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित अजय शिरोडकर, संकेत रामनाथकर आणि आवेश काकोडकर हे तिघे पणजी येथे शिरोडकर एक्सकर्शन एम्पायर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत नोंदणी नसताना विदेशात नोकर भरती करत आहेत. संशयितांनी तक्रारदार व इतरांना फेब्रुवारी २०२४ ते आता पर्यंत अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सुमारे २८ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांना बनावट दस्तावेज देऊन विदेशात पाठविण्यात आले. तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे असलेले दस्तावेज बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना विविध देशात प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांचा छळ झाला. तक्रारदार व इतर व्यक्ती गोव्यात परतल्यानंतर वरील संशयितांकडे रक्कम परत मागितली. त्यावेळी रक्कम परत करण्याऐवजी संशयितांनी तक्रारदार व इतरांना धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी संशयित अजय शिरोडकर, संकेत रामनाथकर आणि आवेश काकोडकर या तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ६१, ३१८, ३३६(१)(३), १४३(१)(३), ३५१ आणि इमिग्रेशन कायदा कलम १० अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. दरम्यान, वरील संशयितांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. या प्रकरणी १४ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.