मडगाव : कोलवातील जिमी कॉटेज येथे नारळ चोरण्यासाठी माडावर चढलेला प्रकाश डुंगडुंग (५४, रा. वेर्णा) जमिनीवर कोसळून जखमी झाला. इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी कोलवा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वेर्णा येथील प्रकाश डुंगडुंग हा आपल्या चार मित्रांसह कोलवा येथील जिमीज कॉटेज या ठिकाणी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेला होता. या कॉटेजच्या परिसरातील माडावरील नारळ चोरण्याच्या उद्देशाने प्रकाश माडावर चढला. प्रकाश माडावर चढला असतानाच माड मुळासकट उन्मळून जमिनीवर कोसळला. यात प्रकाश याला गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिकेला बोलावून तत्काळ त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इस्पितळात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे. पुढील तपास कोलवा पोलीस उपनिरीक्षक रक्षा नाईक करीत आहेत.