कारने ट्रकला धडक दिल्याने गोव्यातील दोघांसह सहा जणांचा मृत्यू

हावेरी ब्याडगी येथे कार-ट्रकचा अपघात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
08th May, 08:33 pm
कारने ट्रकला धडक दिल्याने गोव्यातील दोघांसह सहा जणांचा मृत्यू

हावेरी : थांबलेल्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. मृतामध्ये गोव्यातील दोघांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.

गुरुवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास ब्याडगी पोलीस स्थानक हद्दीत भीषण अपघात घडला. एचआर २६ जे ५३६० या क्रमांकाची ऑडी कार टीएन ५२ एसी ९७५९ या क्रमांकाच्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

फरान (२७, हरिहर), उम्मिशिपा (१६, हरिहर), अलिशा (२०, गाेवा), फुलखान (२०, गोवा) आणि उम्मेरा (हरिहर), असीया (१६, धारवाड) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर, तस्लिन (१८, हरिहर) आणि महक (१८, गोवा) असे दोघेजण अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर हावेरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सर्वजण कुटुंबीयांसह सुट्टीनिमित्त आड्डी गार्डन पार्कला जात होते. तिथून पुढे गोव्यात जाण्याचा त्यांचा बेत होता. याआधी त्यांनी राणेबेन्नूर येथील फिरोज यांच्या घरी कार्यक्रमाला हजेरी लावली. तेथून हे सर्वजण सहलीसाठी रवाना झाले होते. मात्र, ब्याडगी तालुक्यातील मोटेबेन्नूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर थांबलेल्या ट्रकचा कार चालकाला अंदाज आला नाही. भरधाव कार ट्रकला आदळली आणि अनर्थ घडला.

घटनेनंतर मृतदेह हावेरी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.