कुटबण जेटीवरील कामगाराचा अतिसाराने मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th May, 12:24 am
कुटबण जेटीवरील कामगाराचा अतिसाराने मृत्यू

मडगाव : कुटबण जेटीवर काम करणाऱ्या कामगाराचा उपचाराआधीच अतिसारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी कुंकळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.

लाथुरा केरकट्टा (५८, मूळ गुमला झारखंड) हा कुटबण जेटीवर मासेमारी बोटीवर कामासाठी आला होता. तो कुटबण जेटीवर वास्तव्यास होता. मंगळवारी लाथुर याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णवाहिकेतून कुटबण जेटीवरुन बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र, आरोग्य केंद्रात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत कुंकळ्ळी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर कामगाराला अतिसाराचा त्रास होत असल्याचे समजले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून याप्रकरणी नोंद केली. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कुटबन जेटीवर अस्वच्छतेमुळे पसरलेल्या रोगराईतून काही कामगारांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा अतिसारामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने जेटीवरील स्वच्छतेच्या बाबींकडे लक्ष देण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.