चेंगराचेंगरीबाबतचा अहवाल आज होणार सादर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मा​हिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 12:16 am
चेंगराचेंगरीबाबतचा अहवाल आज होणार सादर

पणजी : शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल गुरुवारी सरकारला मिळेल. त्यानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोव्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावातील लईराई जत्रोत्सवात काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर, ७४ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी म्हापसा येथील आझिलो, डिचोली आणि बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहेत. गोमेकॉत चार रुग्णांची​ स्थिती गंभीर आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती.

दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचवेळी महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीत पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, वाहतूक संचालक परिमल अभिषेक आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांचा समावेश आहे. या समितीने गेल्या काही दिवसांत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला असून, प्रत्यक्षदर्शी तसेच देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. ही समिती गुरुवारी आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. त्यानंतर तो सार्वजनिक केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.