२८पेक्षा अधिक प्रवासी जखमी : रस्त्यावर खोदलेल्या चरामुळे अपघातांचा धोका
वास्को : बिर्ला चौकातून वास्कोकडे येणारी मिनी बस क्विनीनगर-सांकवाळ महामार्गावर सायंकाळी पाचच्या दरम्यान उलटल्याने कंडक्टर शिवराज बसवराज मदार (२३, रा. बिर्ला) जागीच ठार झाला. खचाखच भरलेल्या या बसमधील सुमारे २८ पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले. बहुतांश जणांना चिखली उपजिल्हा इस्पितळात, इतरांना कासावली आरोग्य केंद्र इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वास्को-मडगाव मार्गावर प्रवास करणारी (जीए-०६-टी-१६७५) बस गुरुवारी सायंकाळी बिर्ला चौकातून वास्कोकडे येत होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असल्याने बसच्या दरवाजावर काही प्रवाशांसह कंडक्टर उभा होता. बस क्विनीनगर-सांकवाळ येथे पोहचताच अचानकपणे बस महामार्गावर उलटली. बस कंडक्टरच्या बाजूने उलटल्याने एका बाजूचे प्रवाशी दुसऱ्या बाजूच्या प्रवाशांवर पडले. कंडक्टर मदार हा बसच्या दारावरच उभा असल्याने तो बसखाली सापडून जागीच मृत झाला. लोकांनी बसमधील प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. बसच्या काचांमुळे बसमधील काही प्रवाशांना जखमा झाल्या.
वेर्णा पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक आनंद शिरोडकर, वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम, वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर आदी घटनास्थळी आले. अग्निशमन दलही तेथे पोहोचले. रुग्णवाहिका १०८ तेथे आल्या. प्रवाशांना प्राथमिक उपचार करून त्यांना कासावली आरोग्य केंद्र, चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. यासाठी १०८ च्या एकूण पाच रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला. वेर्णा भागातून आलेल्या १०८ ने नऊजणांना, लोटली व दाबोळीहून आलेल्या रुग्णवाहिकांना प्रत्येकी एक, झुआरी महामार्गावर असलेल्या १०८ मधून १३ जणांना तर वास्कोहून आलेल्या रुग्णवाहिकेतून ४ जणांना इस्पितळात नेण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. अपघाताची माहिती मिळाल्यावर वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, उपअधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई तेथे आले.
खोदलेल्या रस्त्याकडे चालकांचे दुर्लक्ष
सध्या क्विनीनगर ते दाबोळी -बोगमाळो महामार्गावर रस्ता रुंदीकरण, उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता खोदण्यात आला आहे. या महामार्गावरून सावधगिरीने वाहने हाकण्याची गरज असते. तथापी बसचालक या गोष्टींकडे दुर्लक्ष करून वेगाने बस हाकतात. गुरुवारी झालेला अपघातही त्यातला एक प्रकार आहे.