वेश्या व्यवसाय; आर्थिक व्यवहार करणारा जाळ्यात

यूपीआय स्कॅनरद्वारे होत होते व्यवहार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 12:10 am
वेश्या व्यवसाय; आर्थिक व्यवहार करणारा जाळ्यात

पणजी : हॉटेल व्यवसायात नोकरीचे आमिष दाखवून विदेशी महिलांना गोव्यात आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मार्च २०२५ मध्ये पर्दाफाश केला होता. या प्रकरणात यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहार करणारा जोहेर अहमद खालिदी (गुलबर्ग - कर्नाटक) या संशयिताच्या गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या.

या प्रकरणी पीडित विदेशी महिलेने ३ मार्च २०२५ रोजी गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मुख्य सूत्रधार नॅन्सी किंगोरी उर्फ आलियान या केनियन महिलेने तक्रारदार महिलेला हॉटेल व्यवसायात नोकरीचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०२४ मध्ये गोव्यात आणले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेचा पासपोर्ट व इतर दस्तावेज संशयितांनी जप्त केले. तिला १८ नोव्हेंबर २०२४ रोजीपासून संशयितांनी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणातून पीडित महिलेने बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने सुटका करुन घेत गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन गुन्हा शाखेचे निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी मुख्य सूत्रधार नॅन्सी किंगोरी उर्फ आलियान हिच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान मुख्य सूत्रधार नॅन्सी किंगोरी बंगळुरू - कर्नाटकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला अटक केली.

दरम्यान, पीडित महिलेची चौकशी केली असता, नॅन्सी किंगोरीने तक्रारदार महिलेला एक यूपीआय स्कॅनर दिल्याची माहिती दिली. सदर स्कॅनर गुलबर्ग - कर्नाटकातील जोहेर अहमद खालिदी याच्या नावे असल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले. पथकाने बुधवार ७ रोजी संशयित जोहेर अहमद खालिदी याचा मुसक्या आवळल्या. त्याला ते गोव्यात घेऊन येत आहेत.

संशयित कर्नाटकातून ताब्यात

नॅन्सी किंगोरीने तक्रारदार महिलेला एक यूपीआय स्कॅनर दिला होता. हा स्कॅनर गुलबर्ग - कर्नाटकातील जोहेर अहमद खालिदी याच्या नावे असल्याचे समोर आले. यानंतर गुन्हे शाखेने कर्नाटक येथून संशयित जोहेर अहमद खालिदी याला ताब्यात घेतले.