वृद्ध महिलेला २.६३ कोटींना गंडविले; गुजरातमधील एकास अटक

गुंतवणुकीच्या नावाखाली केली होती फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 hours ago
वृद्ध महिलेला २.६३ कोटींना गंडविले; गुजरातमधील एकास अटक

पणजी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावे बनावट जाहिरात देऊन बार्देश तालुक्यातील एका वृद्ध महिलेला क्रिफ्टो आणि इतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली २.६३ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी सायबर विभागाने रमेश कुमार यादव (३९, गुजरात) या संशयिताला अटक केली आहे.

बार्देश तालुक्यातील एका ६७ वर्षीय वृद्ध महिलेने १८ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदार महिलेने १३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची ऑनलाईन जाहिरात पाहिली होती. त्यात अंबानी यांनी माऊंटो या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार तक्रारदार महिलेने www.maunto.com या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तिला कमीत कमी २५० डॉलर गुंतवण्यास सांगितले. त्यानंतर तिला अलिझा या महिलेने झूम काॅल तसेच टेलिग्राम व इतर सोशल मीडियामार्फत गुंतवणूक करण्यासाठी प्रशिक्षण दिले.

तिच्या आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेतून संशयितांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँकेत २ कोटी ६३ लाख ३० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेने १० मार्च रोजी १०० डॉलर काढण्यासाठी विनंती केली असता, अलिझा या महिलेने वेगवेगळी कारणे देत नकार दिला. तिला संशय आल्यानंतर तिने याबाबत मैत्रिणीला सांगितले. या गुंतवणुकीमुळे तिची फसवणूक झाल्याचे समोर आले. महिलेने सायबर विभागात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, सायबर विभागाला रमेश कुमार यादव (३९, गुजरात) या संशयिताच्या बँक खात्यात तक्रारदार महिलेचे १० लाख रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली. गुजरातमध्ये पथकाने जाऊन त्याला अटक केली.

गुजरातमधून आणले गोव्यात

पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल सिद्धरयमा मठ आणि यश कोले या पथकाला अहमदाबाद - गुजरात येथे रवाना करण्यात आले. पथकाने रमेश कुमार यादव (३९, गुजरात) याला अटक करून गोव्यात आणले आहे.