अखेर राज्य सहकारी बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक समिती

संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक न घेतल्यामुळे निर्णय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th May, 12:36 am
अखेर राज्य सहकारी बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक समिती

पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. चार्टर्ड अकाऊंटंट संतोष केंकरे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर, चार्टर्ड अकाऊंटंट लक्ष्मीकांत नाईक आणि गोवा नागरी सेवेचे अधिकारी विशांत गावणेकर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. याबाबतचा आदेश सहकार निबंधक कबीर शिरगांवकर यांनी जारी केला आहे.

गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आली होती. त्यात उल्हास फळदेसाई यांची अध्यक्षपदी निवड झाली. संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२४ मध्ये संपला होता. कायद्यानुसार, संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका घेऊन नवीन मंडळाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे, असे असताना मागील ८ महिने सहकार निबंधकांनी काहीच केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका द सहकार अर्बन क्रेडीट को- आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष उदय प्रभू यांनी दाखल केली आहे. तसेच बँकेवर प्रशासक नियुक्ती करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, सहकार निबंधकांनी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया हाती घेत बँकेवर प्रशासक समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली. बुधवारी सहकार निबंधक कबीर शिरगांवकर यांनी आदेश जारी करून बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक समिती नियुक्ती केली. त्यानुसार, चार्टर्ड अकाऊंटंट संतोष केंकरे समितीचे अध्यक्ष असणार आहे. चार्टर्ड अकाऊंटंट लक्ष्मीकांत नाईक आणि गोवा नागरी सेवेचे अधिकारी विशांत गावणेकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली असता, सहकार निबंधकांनी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू करून सरकारकडे पाठविल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी ८ रोजी ठेवली. त्यावेळी बँकेवर प्रशासक नियुक्ती आणि निवडणुकीच्या प्रक्रियांची माहिती द्या, असा आदेश न्यायालयाने सहकार निबंधकांना दिला आहे.