अमेरिकेकडून पाकिस्तानला होणारी शस्त्रांची मदत रोखण्यात आले होते यश
पणजी : भारत आणि पाकिस्तानात १९७१ मध्ये झालेल्या युद्धादरम्यान गोव्यातील दाबोळी एअरबेस आणि विमानतळाचा वापर झाला होता. या दोन्हींच्या मदतीने भारतीय नाविक दलाने अरबी समुद्रातून अमेरिकेकडून पाकिस्तानला होणारी सर्वप्रकारची मदत रोखली होती, अशी माहिती माजी नौदल अधिकारी रामदास महाले यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
१९७१ च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेत पाकिस्तानला युद्धासाठी लागणारी शस्त्रे आणि दारूगोळा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्याची वाहतूक अरबी समुद्रातून होणार होती. त्यामुळे भारताने समुद्राच्या काठांवर वसलेल्या गोव्यासह इतर काही राज्यांतील नाविक तळांचा वापर केला होता. गोव्यातील दाबोळी एअरबेसजवळ विक्रांत जहाजाला तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिमी भागातील लोकांमध्ये वारंवार संघर्ष वाढला होता. भाषा, संस्कृती, राहणीमान, विचारांवर हा वाद पेटला होता. शेख मुजीबुर्रहमान यांनी पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला होता. या सर्व घडामोडींमुळे अनेक बंगाली नेते पाकिस्तानच्या निशाण्यावर आले. पाकिस्तान दबावाखाली शेख मुजीबुर्रहमान आणि अन्य लोकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र ही कारवाई पाकिस्ताला भारी पडली. मार्च १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांची निर्दयी हत्या केली. महिलांसोबत बलात्काराच्या घटना घडत राहिल्या. त्यावेळी पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या शरणार्थींची संख्या वाढली. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतावर दबाव वाढला. त्यामुळे २९ जुलै १९७१ रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या सैनिकांना मदत करण्याची घोषणा केली गेली. दि. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर हल्ले केले. परिणामी, भारताने पाकिस्तानसोबत युद्ध छेडत त्यात पाकचा पराभव केला होता.
आपण १९७४ मध्ये नाविक दलात भरती झालो. त्यानंतर आम्हाला अधिकाऱ्यांनी या सर्व घटनांची माहिती दिली. शिवाय युद्धाभ्यासाच्या काळातही आम्हाला त्याप्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते, असे माजी नौदल अधिकारी रामदास महाले यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावर वीस लढाऊ विमाने होती तैनात
गोव्यातील दाबोळी एअरबेसजवळ विक्रांत जहाजाला तैनात करण्यात आले होते. त्याद्वारे अरबी समुद्रातून अमेरिकेकडून पाकिस्तानला पुरवण्यात येणारी शस्त्रांची मदत रोखण्यात आली होती. या एअरबेसवर सुमारे ५०० जवान तैनात करण्यात आले होते, असे महाले म्हणाले. दाबोळी विमानतळावरही सुमारे वीस लढाऊ विमाने तैनात ठेवण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले