शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमेवर केला बेछुट गोळीबार
श्रीनगर : शनिवारी जम्मूतील आरएस पुरा भागात पाकिस्तानने केलेल्या जोरदार गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आठ जवान जखमी झाले. त्यापैकी एक, उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज, शहीद झाले. उर्वरित सात सैनिकांवर उपचार सुरू आहेत. बीएसएफने मोहम्मद इम्तियाज यांच्या बलीदानाला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सीमा चौकीचे नेतृत्व करताना अदम्य धैर्य दाखवले असे बीएसएफने म्हटले आहे. डीजी बीएसएफ आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी सायंकाळी ५ वाजता अधिकृत शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन तासांत पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुन्हा गोळीबार सुरू केला. २२ एप्रिलपासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या या कारवायांमध्ये आतापर्यंत चार भारतीय जवान शहीद झाले असून, ६० हून अधिक जवान आणि सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. १७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने सीमेवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू केला होता.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे १० मे रोजी संध्याकाळी संघर्षविराम जाहीर करण्यात आला. तरी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापतीमुळे सीमेवरील तणाव कायम आहे.