भविष्यात जत्रेच्या आयोजनात कोणतीही उणीव राहू नये यासाठी देवस्थान समिती प्रयत्नरत.
डिचोली : शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात उद्भवलेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने धोंडगणांची नाव नोंदणी सक्तीची केली आहे. सर्वांनी दोन पासपोर्ट साईझचे फोटो तसेच ओळखपत्र लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
प्रकरण काय ?
शिरगावच्या लइराई देवीच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला तर ८० हून अधिक जण जखमी झाले. अनेक जणांना उपचारांती घरी जाऊ देण्यात आले, तर काहींची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांचावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान धोंडगणांच्या वर्तनावर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. यामुळे अनेक गोष्टींचा विचार करता, शिरगावच्या लईराई मंदिर प्रशासनाने धोंडांवर प्रतिबंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने, त्यांनी नवीन सूचना जारी केली आहे. भविष्यात जत्रेच्या आयोजनात कोणतीही उणीव राहू नये व उत्सव सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी देवस्थान समिती प्रयत्नरत आहे.
चौकशी समितीच्या अहवालात काय ?
महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने घटनास्थळी जाऊन तसेच प्रत्यक्षदर्शींशी चर्चा करून अखेरीस पाच दिवसानंतर अखेर गुरुवारी रात्री उशिरा १०० पानी अहवाल तयार करून तो मुख्य सचिव डॉ. वी. कांडावेलू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.
लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीला चौकशी समितीने उत्तर गोव्याच्या माजी जिल्हाधिकारी स्नेहा गीते, माजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे माजी उपअधीक्षक जीवबा दळवी, माजी निरीक्षक दिनेश गडेकर, माजी उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर यांच्यासह देवस्थान समिती आणि पंचायत समितीलाही दोषी ठरवले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. सरकार अहवालातील निष्कर्ष तपासत असून, दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी हमीही त्यांनी दिली.