अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या तरुण- तरुणीला डंपरने चिरडले

हुमरमळा येथील अपघातात दोघे ठार : दुसऱ्या अपघातात ११ जखमी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
13th May, 09:26 pm
अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या तरुण- तरुणीला डंपरने चिरडले

सिंधुदुर्गनगरी : मुंबई- गोवा महामार्गावर मंगळवारी हुमरमळा येथील पेट्रोल पंपानजीक टाटा मोटर्स समोर भीषण अपघात झाला. मुंबईकडून दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोव्हा कारने मोटारसायकलला उडविले. यात मोटारसायकल स्वारासहित ११ जण जखमी झाले. तर, हा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या कॉलेजच्या तरुण, तरुणीला डंपरने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला.

रोहित कुडाळकर (३०, रा. ओरोस वर्दे रोड) हे कामावर मोटरसायकलने जात असताना मागून मुंबई येथून आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी घोटगे (ता. दोडामार्ग) येथे जात असलेल्या एम.एच.०६ ए.बी. ८२१९ या इनोव्हा कारने धडक दिली. ही कार रस्त्याच्या खाली कोसळली. त्यामुळे कारचा चालक गंभीर जखमी झाला. त्यातील प्रवासीही जखमी झाले. मोटारसायकल स्वार रोहित कुडाळकर रस्त्यावर फेकला गेल्याने तोही गंभीर जखमी झाला.

हा अपघात घडला असताना ओरोसहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकल एम. एच. ०७ ई ७८९६ वरून विनायक निळेकर व पाठीमागे बसलेली अनुष्का माळवे हे अपघात पाहण्यासाठी थांबले. त्याचवेळी त्यांचा तोल गेला व हे दोघे महामार्गावर कोसळले. त्यामुळे हे दोघे त्यांच्या मागून आलेल्या डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडले. दोघांना चिरडून तो डंपर निघून गेला. पोलिसांनी संबंधित डंपर चालक सुनील विष्णू कोळकर (५२, रा. वाडीवरवडे कुडाळ) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक सावंतवाडी विनोद कांबळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी भेट देत उपस्थितांशी चर्चा केली. त्यानंतर नातेवाईकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले.

अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

अपघातानंतर रानबांबुळी, दाबाची वाडी, ओरोस, पणदूर परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे गाठले. डंपर चालक आणि मालकाला समोर आणा अन्यथा आम्ही दोन्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. बराच वेळ पोलीस स्थानकामध्ये वातावरण तंग झाले होते. त्यानंतर त्या ठिकाणी भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत आदींनी केलेल्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाले.