राज्याच्या महसुलाला जबर फटका : गोवा मद्य विक्रेता संघटनेची कारवाईची मागणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील मद्य स्वस्त म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील पर्यटक येथून चोरून मद्य आपल्या राज्यात नेत असतात. मात्र मागील काही वर्षांत हरियाणा, चंडीगढमध्ये उंची मद्य गोव्यापेक्षा स्वस्त झाले आहे. यामुळे तिथे तयार झालेल्या कमी दरातील मद्याची गोव्यात अवैध पद्धतीने तस्करी करून तिची विक्री करणे सुरू आहे. यामुळे राज्याच्या महसुलाला जबर फटका बसत आहेच. शिवाय स्थानिक मद्य विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मंगळवारी गोवा मद्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अबकारी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना असे गैरप्रकार थांबवण्याबाबत निवेदन दिले.
संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले की, मागील पाच ते सहा वर्षे हरियाणातील मद्य अवैधपणे गोव्यात आणून विक्री करणे सुरू आहे. याबाबत आम्ही अनेकदा अबकारी खात्याला निवेदन दिले आहे. मात्र याबाबत कोणतीही कारवाई होत नाही. खात्याने नुकतेच पत्रादेवी सीमेवर हरियाणात तयार झालेले सुमारे एक कोटी रुपयांचे मद्य पकडले होते. याबाबत आम्ही अबकारी खात्याचे अभिनंदन करतो; मात्र अशी कारवाई कायम सुरू राहिली पाहिजे.
पत्रादेवी येथे पकडण्यात आलेल्या कंपनीचे मद्य गोव्यात विकण्याचे अधिकार गोव्यातील केवळ एका व्यक्तीकडे आहेत. त्यांनी आपण हे मद्य गोव्यात आणले नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्हालाही त्या ब्रँडचे मद्य विकायचे असेल तर प्रथम त्याच अधिकृत विक्रेत्याकडून विकत घ्यावे लागते. पत्रादेवी येथील मद्य एका स्थानिक व्यक्तीच्या कंपनीच्या नावे आणली होती; मात्र आमच्या माहितीनुसार ती व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य विकत घेऊच शकत नाही.
गोव्यात बाहेरील मद्य आणणाऱ्या लोकांची ‘मोडस ओप्रेंडी’ आहे. अशा व्यवसायात गुंतलेले बहुतेक लोक हरियाणातील आहेत. त्यांनी गोव्यातील लोकांकडून लिजवर दुकाने चालवण्यासाठी घेतली आहेत. सध्या कळंगुट, कांदोळी, वागतोर, कोलवा, हणजुणे, काणकोण येथे असे व्यवसायिक काम करत आहेत. हे लोक बाहेरील कमी दरातील मद्य गोव्यात विकत असल्याने येथील स्थानिक मद्याची विक्री कमी झाली आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय येत आहेत. स्थानिक लोकांनी अशा व्यक्तींना लीजवर दुकाने चालवण्यासाठी देऊ नयेत.
दरम्यान, अबकारी खात्याने पत्रादेवी येथे रविवारी करबुडवेगिरी करणाऱ्या मद्य विक्री रेकॅटचा पर्दाफाश केला होता. हरियाणामधील एका मद्य वितरक कंपनीने उच्च दर्जाचा मद्यसाठा ‘कस्टम’साठी असल्याचे भासवत गोव्यात अवैधरीत्या पाठवण्याचा प्रयत्न केला होता. हरियाणात नोंदणीकृत ट्रकमधून शिव्हास रीगल, अब्सोल्यूट व्होडका, जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल यांसारख्या उंची मद्याच्या बाटल्या सापडल्या होत्या. या मद्यसाठ्याची वाहतूक करण्यासाठी वाहकाकडे परवानगी नव्हती, मद्याच्या बाटल्यांवर लेबलही नव्हते, तसेच कस्टम क्लिअरन्सही नव्हता.
या प्रकरणात ट्रकचालकाला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. ट्रकमधील बाटल्या ७५० मिलीच्या होत्या. या कस्टमसाठी नसून केवळ किरकोळ विक्रीसाठी वापरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले होते. अधिकाऱ्यांनी अधिक खोलवर चौकशी केली असता चालकाच्या दाव्यातील अनेक विसंगती उघड झाल्या होत्या. या प्रकरणी पिळर्ण येथे असलेल्या एका गोदामावर अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.
उंची मद्याच्या दरात ४० ते ५० टक्के फरक
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील आणि हरियाणा किंवा चंदीगड येथील उंची मद्याच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के फरक आहे. गोव्यात मिळणाऱ्या उंची स्कॉच हरियाणा, गुडगाव येथे जवळपास निम्म्या किमतीत मिळतात. मद्याच्या दरातील मोठ्या फरकामुळेच राज्यात दारू तस्करी केली जात आहे. यामध्ये काही स्थानिक व्यापारी, क्लब, पब गुंतलेले असण्याची शक्यता आहे. हे लोक कमी दरातील मद्य विकून स्वतः फायदा करून घेत आहेत. मद्याची तस्करी रस्तामार्गे केली जात आहे. हवाई प्रवासातूनही मद्य आणले जात असण्याची शक्यता आहे.
अवैध व्यापार करणाऱ्या ४०० जणांची यादी
राज्यात अवैध व्यापार करणाऱ्या ३०० ते ४०० लोकांची यादी आहे. आम्ही ही यादी अबकारी खात्याला दिली होती; मात्र त्यावर कारवाई झाली नाही. असे असले तरी आम्ही पुन्हा एकदा अबकारी खाते तसेच क्राईम ब्रांचला ही यादी देणार आहोत. अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात आम्ही संघटनेतर्फे अधिकृत तक्रारही करणार आहोत. या व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांचा केवळ मद्यपरवाना रद्द करून चालणार नाही, तर पडद्यामागील खऱ्या सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. अबकारी आयुक्तांनी या प्रकरणात गुंतलेल्या कुणालाही सोडणार नसल्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे, असे दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले.