गोव्यात आण्विक ऊर्जा प्रकल्प आणणार नाही : मुख्यमंत्री

केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांच्या विधानाचे विरोधकांकडून राजकारण


5 hours ago
गोव्यात आण्विक ऊर्जा प्रकल्प आणणार नाही : मुख्यमंत्री

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गोवा हा लहान प्रदेश असून आम्हाला आण्विक ऊर्जा प्रकल्पाची गरज नाही. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आण्विक ऊर्जा प्रकल्पाविषयी विचारांचे विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. विषय आणि मुद्दे नसतात, तेव्हा काँग्रेसवाले लोकांची दिशाभूल आणि खोटा प्रचार करतात, असा आरोप करत आम्ही कदापि आण्विक ऊर्जा प्रकल्प गोव्यात आणणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
मंगळवारी म्हापशात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, उपसभापती जोशुआ डिसोझा, उत्तर गोवा जिल्हा मंडळाध्यक्ष दयानंद कारबोटकर, नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, मंडळ अध्यक्ष योगेश खेडेकर व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्हाला गोमंतकीयांची आणि पर्यावरणाची काळजी आहे. लोकांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये. २००५ ते २०१२ या कालावधीत काँग्रेसचे डबल इंजिनचे सरकार होते. तेव्हा त्यांच्या सरकारने गोव्यात कुठलाच प्रकल्प राबवला नाही. मोदी सरकारमुळे आम्ही गोव्यात ३० हजार कोटी रुपये फक्त मूलभूत विकासावर खर्च केले. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले, येत्या दोन दिवसांत म्हापसा मतदारसंघात ३१ कोटी रुपये खर्च करुन रस्ते हॉटमिक्सिंगचे काम हाती घेतले जाईल. मध्यंतरी बाहेरील व्यक्तींनी म्हापशात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला; परंतु संबंधितांना म्हापसेकरांनी त्यांची योग्य जागा दाखविली.
आमचा लढा दहशतवादाविरोधात !
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सरकारने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्यांने दहशतवाद्यांचे नऊ तळ उद् ध्वस्त केले. या कारवाईत पाकिस्तानमधील जनतेला हानी पोहचवली नाही. आमची लढाई फक्त दहशतवादाविरोधात आहे. मोदी सरकार दहशतवाद्यांचे उच्चाटन केल्याशिवाय राहणार नाहीत. पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचे पाणी थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.