वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहने पर्यायी मार्गाने वळवली
पणजी : मेरशी ते जुने गोवा कदंब बगल मार्गावर चिंबल जंक्शन जवळ सोमवारी रात्री दुसऱ्या वाहनाला वाचविण्याच्या नादात कंटेनर उलटला. यात चालक जगतसिंग तुसराम जखमी झाला. या अपघातामुळे वरील मार्गावर मंगळवारी सकाळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे पणजीहून जुने गोव्याच्या बाजूल्या जाणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने रायबंदर मार्गे पोलिसांनी वळवली.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कंटेनर पणजीहून कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत माल घेऊन जात होता. याच दरम्यान मेरशी ते जुने गोवा कदंब बगल मार्गावर चिंबल जंक्शन जवळ कंटेनर पोहचला असता, विरुद्ध दिशेने एका गाडी आली. ती आपली दिशा सोडून कंटेनरच्या मार्गावर आली. त्यावेळी तिला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर रस्त्यावर उलटला. यात कंटेनर चालक जगतसिंग तुसराम जखमी झाला. त्याला स्थानिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यानंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. अपघातामुळे मंगळवारी मेरशी ते जुने गोवा कदंब बगल मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्याची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी पणजीहून जुने गोव्याच्या बाजूल्या जाणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने रायबंदर मार्गे पोलिसांनी वळवली.
या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.