युद्धबंदीनंतर पंजाब, राजस्थानमधली परिस्थिती पूर्वपदावर, मात्र पुढील काही दिवस..

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
युद्धबंदीनंतर पंजाब, राजस्थानमधली परिस्थिती पूर्वपदावर, मात्र पुढील काही दिवस..

नवी दिल्लीः  भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्यानंतर आता सीमेवरही परिस्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. काल रात्री जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तान सीमेलगतच्या अन्य राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य असल्याची दिसून आली. ११ मे रोजी राजस्थानमध्ये रद्द केलेल्या २७ गाड्या पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले. 

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये रद्द केलेल्या ८ गाड्या नेहमीप्रमाणे चालवण्याचे आदेश देण्यात आले. १० मे पासून रद्द करण्यात आलेल्या गुजरात ते राजस्थान रात्रीच्या गाड्याही आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. 

 गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या रद्द केलेल्या रजांबाबतही आज महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र पुढील काही दिवस सीमेलगतच्या भागात सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, शिक्षण विभागाने सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सध्या बंद राहतील. एनआयटी श्रीनगरमध्ये ६ जूनपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू राहतील अशीही माहिती मिळाली आहे. जोधपूर, बिकानेर, बारमेर आणि श्रीगंगानगरमध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, अंगणवाडी केंद्रे आणि कोचिंग सेंटर उघडतील. सीमावर्ती जिल्ह्यांतील बिकानेर, जैसलमेर, बारमेरमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे वृत्त हाती आले आहे.

काही भागात अद्याप अलर्ट जारी -
अमृतसर, तरणतारन आणि पठाणकोट जिल्हा प्रशासनाने मंगळवार, १३ मे रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेत काही भागात अलर्ट जारी केला आहे. फाजिलका प्रशासनाने पुढील २ दिवस सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर रात्री अमृतसरमध्ये काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच, इंडिगो आणि एअर इंडियाने आज चंदीगड आणि अमृतसरला जाणारी आणि येणारी उड्डाणे रद्द केली आहेत.

हेही वाचा